MSRTC Financial Crisis
मुंबई : एसटी कर्मचार्यांच्या वेतनासह महामंडळाची एकूण थकीत देणी रक्कम सात हजार कोटी रुपयांच्यावर गेली असून संचित तोटा दहा हजार कोटी रुपयांच्या वर गेला आहे. त्यामुळे एसटी प्रशासन हतबल झाले आहे. चालू महिन्याच्या वेतनासाठी व इतर थकीत देणी देण्यासाठी शासनाकडे एक हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त रकमेची मागणी करण्यात आली होती, पण त्यातील केवळ 374 कोटी 9 लाख रुपये इतका निधी सरकारकडून देण्यात आला आहे. त्यामुळे एसटी कर्मचार्यांचा पगार रखडू शकतो.
एसटी कर्मचार्यांच्या वेतनासाठी दर महिन्याला सरकारकडून निधी उपलब्ध करून दिला जातो. पण गेले अनेक महिने मागणीप्रमाणे आवश्यक निधी येत नाही. या महिन्यात तर पुन्हा पूर्ण वेतन देण्याइतकाही निधी सरकारकडून आलेला नाही.
87 हजार कर्मचार्यांना नक्त वेतन देण्यासाठी 377 कोटी रुपये इतकी रक्कम लागते, तर पूर्ण वेतन देण्यासाठी 460 कोटी रुपये इतकी रक्कम लागते.
पूर्ण वेतन देण्यात अडचणी निर्माण होत असून पी.एफ., ग्रॅच्युईटी, बँक कर्ज, एल.आय. सी., अशी साधारण 3500 कोटी रुपयांची देणी कर्मचार्यांच्या वेतनातून कपात होऊनसुद्धा त्या त्या संस्थांकडे वर्ग करण्यात आलेली नाहीत, अशी माहिती महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी दिली.
एप्रिल महिन्यात पूर्ण वेतन देण्यासाठी निधी उपलब्ध नसल्याने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अर्थ खात्यातील अधिकार्यांना मागणी करण्यात आलेली पूर्ण रक्कम एसटीला देण्याच्या सूचना दिल्या होत्या.पण अर्थ खात्यातील अधिकार्यांनी त्यांनाही जुमानले नसून त्याची शिष्टाईसुद्धा निष्फळ ठरली असल्याचा आरोपही बरगे यांनी केला.
आर्थिक अडचणीच्या वेळी कर्मचारी आपल्या शिल्लक रजेतील काही रजा विकत असतात. त्याचे त्यांना पैसे मिळत असतात. पण यावेळी निधीअभावी रजा रोखीकरण महामंडळाकडून रोखले असून सुमारे तीन कोटी रुपये इतकी रक्कम कर्मचार्यांना या महिन्यात मिळणार नाही. अशी धक्कादायक माहिती समोर आली असल्याचेही बरगे यांनी सांगितले.