मुंबई : राज्यातील सर्वसामान्य जनतेची जीवनवाहिनी असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवाशांना महागाईचा मोठा फटका बसला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या वतीने सादर करण्यात आलेल्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास अखेर अधिकृत मान्यता दिली आहे. ही सुधारित दरवाढ आज मध्यरात्रीपासूनच संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात येणार आहे. मात्र, या भाडेवाढीसोबतच महामंडळाने प्रवाशांना एक दिलासा दिला असून, यापूर्वी लागू करण्यात आलेली साध्या बसेसची १० टक्के हंगामी भाडेवाढ आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे.