मुंबई : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वांद्रे रेक्लेमेशन येथील मुख्यालयाच्या पुनर्विकासाचे कंत्राट अदानी समूहाला मिळाले आहे. या 24 एकर जागेचा पुनर्विकास करण्यासाठी एमएसआरडीसीचे कार्यालय रिकामी करण्यात आले आहे. सोमवारपासून या कार्यालयाचे कामकाज दादर येथील कोहिनूर स्क्वेअर येथील कार्यालयातून चालवण्यात येईल.
फेब्रुवारीपासून पहिल्या टप्प्याचे काम हाती घेतले जाणार आहे. यात कार्यालयाच्या 5.50 एकर जागेवर उंच इमारती उभारण्यात येणार आहेत. 4 हजार किमीहून अधिक लांबीच्या रस्त्यांची कामे सध्या एमएसआरडीसीकडून केली जात आहेत. यात नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्ग, कल्याण-लातूर जनकल्याण महामार्ग, वाढवण बंदर भरवीर महामार्ग, इत्यादींचा समावेश आहे. यासाठी लागणारा निधी पुनर्विकासातून उभारला जाणार आहे.
वांद्रे येथील मुख्यालय अधिक कास्टिंग यार्ड यांच्या एकूण 24 एकर जागेसाठी एमएसआरडीसीने निविदा मागवली होती. यानुसार हे कंत्राट अदानी समूहाला मिळाले आहे. यापूर्वी धारावी पुनर्विकास प्रकल्प आणि मोतिलालनगर पुनर्विकास प्रकल्प ही दोन कंत्राटे अदानी समूहाला मिळाली आहेत.
वांद्रे येथील मुख्यालयाचे पाडकाम फेब्रुवारीमध्ये सुरू होणार आहे. पुढील पाच वर्षांत पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण होईल. त्यानंतर दुसऱ्या टप्प्याचे काम मे 2028मध्ये सुरू केले जाणार आहे. पुनर्विकास प्रकल्पातून मिळणाऱ्या नफ्यातील 23 टक्के हिस्सा म्हणजेच 8 हजार कोटी रुपये एमएसआरडीसीला मिळणार आहेत.