मुंबई : महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने आपल्या संलग्न अभियांत्रिकी, फार्मसी आणि वास्तुकला परिषद पदविका अभ्यासक्रम राबविणाऱ्या सर्व संस्था तसेच स्वायत्त संस्थांसाठी बाह्य संस्था अवेक्षण (एक्स्टर्नल इन्स्टिट्यूट मॉनिटरिंग) प्रक्रियेत मोठे बदल केले आहेत. सीआयएएएन-२०२३च्या अनुषंगाने तयार करण्यात आलेल्या नव्या मानकांनुसार (केपीआय नॉर्म्स) मूल्यांकनाचे पत्रक आता सुधारित करण्यात आले असून, या बदलांची अंमलबजावणी शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून होणार आहे.
राष्ट्रीय मानांकन मंडळ (एनबीए) च्या निकषांनुसार तांत्रिक शिक्षण संस्थांचे मूल्यांकन अधिक वस्तुनिष्ठ आणि पारदर्शक करण्यासाठी सीआयएएएन- २०२३च्या हे फ्रेमवर्क तयार करण्यात आले आहे. नव्या शैक्षणिक आणि अभ्यासक्रमीय रचनेशी सुसंगत राहण्यासाठी एनईपी २०२० कम्प्लायंट आणि के स्कीम अंतर्गत संस्थांच्या गुणवत्ता मापनात सुधारणा करण्याचा उद्देश या बदलामागे आहे.
महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने या नव्या प्रणालीअंतर्गत प्रत्येक संस्थेच्या तसेच विभागांच्या कार्याचे मूल्यांकन ४०० गुणांच्या सुधारीत मानकांनुसार केले जाणार आहे. यामध्ये अध्यापन नियोजन, प्रयोगशाळा उपक्रम, विद्यार्थ्यांचे सतत मूल्यमापन, निकाल विश्लेषण, विद्यार्थी अभिप्राय तसेच उद्योगसंलग्न उपक्रम अशा विविध घटकांचा समावेश करण्यात आला आहे.
या प्रक्रियेसाठी मंडळाच्या ऑनलाईन इन्स्टिट्यूट मॉनिटरिंग सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक तांत्रिक बदल पूर्ण करण्यात आले आहेत. संस्थांना आता सर्व माहिती डिजिटल स्वरूपात अपलोड करावी लागणार आहे. सुधारित इव्हॅल्युएशन शीट (केपीआय नॉर्म्स) चा अवलंब सर्व संस्थांनी नव्या सूचनांनुसार आपली तयारी त्वरित सुरू करावी, असे निर्देश मंडळाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक यांनी दिले आहेत.
या बाबीबवर विशेष लक्ष...
अध्यापनाचे नियोजन, प्रयोगशाळेतील उपक्रमांची आखणी
दररोजच्या चाचण्या आणि अंतिम मूल्यमापन प्रणाली
विद्यार्थ्यांच्या स्वअभ्यास, मायक्रो प्रोजेक्ट्स व असाइनमेंट्सचा आढावा
शैक्षणिक निकालाचे विश्लेषण आणि प्रगती निर्देशक
विद्यार्थी प्रवेश व आणि उद्योग आधारित केलेल्या बदल व सुधारणा