MPSC Paper Leak Case | पार्किंगमध्येच प्रश्न संचाची देवाणघेवाण; एमपीएससी अधिकाऱ्यामार्फत पेपर बाहेर 
मुंबई

MPSC Paper Leak Case | पार्किंगमध्येच प्रश्न संचाची देवाणघेवाण; एमपीएससी अधिकाऱ्यामार्फत पेपर बाहेर

मोठ्या रॅकेटचा संशय; पैशांचा व्यवहार किती? गुन्हे शाखेचा तपास

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्येच २९४ प्रश्नांचा संच एका अधिकाऱ्याकडून दुसऱ्या अधिकाऱ्याकडे देण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. त्यानंतर हा संच आयोगाबाहेरील व्यक्तींपर्यंत पोहोचल्याचे तपासात समोर आले आहे. तीन एमपीएससी अधिकाऱ्यांसह सहाजणांना अटक झाल्यानंतर आता या प्रकारामागे आणखी मोठे नेटवर्क आहे का, प्रश्नसंच किती उमेदवारांपर्यंत पोहोचला आणि त्यासाठी किती पैशांचा व्यवहार झाला, याचा गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे.

पार्किंगमध्ये प्रश्नसंचाची देवाणघेवाण

पोलिसांच्या तपासानुसार १९ मार्चला म्हणजेच २२ मार्चच्या परीक्षेच्या तीन दिवस आधी, सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नकाते याने तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नपेढीतून २९४ प्रश्नांचा संच बेकायदेशीररीत्या मिळवल्याचा आरोप आहे. त्याचदिवशी हा संच त्‍याने एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंडवे याच्याकडे आयोगाच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये दिल्याचा दावा करण्यात आला आहे.

२९४ पैकी ७७ प्रश्न तंतोतंत

लीक झालेल्या प्रश्नसंचातील २९४ प्रश्नांपैकी ७७ प्रश्न पर्यायांसह तंतोतंत जुळल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळे प्रश्नसंच परीक्षेपूर्वीच बाहेर गेल्याच्या तपासाला महत्त्वपूर्ण आधार मिळाला आहे.

पाच लाखांचा व्यवहार?

या प्रकरणात प्रश्नसंचासाठी पाच लाख रुपयांचा व्यवहार झाल्याचा गुन्हे शाखेचा दावा आहे. प्रवीण पाटील यांनी मराठे यांना पाच लाख रुपये रोख दिले; त्यानंतर हे पैसे पुढे लेंडवे आणि नकाते यांच्यापर्यंत पोहोचल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या आर्थिक साखळीची पडताळणी सुरू आहे.

४० लाखांच्या व्यवहार?

दरम्यान, शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी प्रश्नपत्रिका प्रत्येकी ४० लाख रुपयांना विकली गेल्याचा आरोप केला आहे. मात्र, ४० लाखांच्या व्यवहाराची अधिकृत पुष्टी तपास यंत्रणेकडून झालेली नाही. त्यामुळे हा मुद्दा रोहित पवारांचा आरोप म्हणूनच मांडणे योग्य ठरेल.

प्रेमाचा ब्रेकअप अन्‌ पेपरफुटीची माहिती लिक

या प्रकरणाला प्रेम प्रकरणाचा अनपेक्षित अँगलही आहे. पोलिसांच्या तपासानुसार, गौरव ऊर्फ लोकेश पाटील याने प्रेयसी ऋतुजा पाटील हिला परीक्षेत मदत करण्यासाठी कथितरीत्या प्रश्नसंच मिळविला आणि तो तिच्यापर्यंत पोहोचविला. ऋतुजाने परीक्षा दिल्यानंतर ती उत्तीर्ण झाली. मात्र, त्यानंतर दोघांचे संबंध बिघडले आणि ब्रेकअप झाले. ब्रेकअपनंतर गौरवने एमपीएससीकडे पेपरफुटीची माहिती दिली. त्यानंतर तपास सुरू झाला.

परीक्षा ऑफलाईन घ्या : वडेट्टीवार

नागपूर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षांबाबत मोठ्या प्रमाणात तक्रारी येत असून आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा पेपर लव्ह स्टोरीमध्ये फुटलेला नाही तर यात सत्ताधाऱ्यांचा हस्तक्षेप आहे, असा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ नेते आ. विजय वडेट्टीवर यांनी केला. एमपीएससीचे अध्‍यक्ष हे आरटीओ विभागातून सेवा निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या प्रशासकीय पार्श्वभूमीचीही तपासणी झाली पाहिजे. हे सगळे पेपर ऑनलाईन घेण्यापेक्षा ऑफलाईन पद्धतीने घ्यावेत, अशी मागणीही त्‍यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT