मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षक पदाच्या परीक्षेतील प्रश्नपत्रिका फुटीच्या तपासाला नवे धागेदोरे मिळाले आहेत. एमपीएससीचे अधिकारी विश्वेश्वर नकाते यांनी खाडीत फेकल्याचा संशय असलेला लॅपटॉप गुन्हे शाखेने हस्तगत केला आहे. या लॅपटॉपमधील डेटा मिळविण्यासाठी सायबर फॉरेन्सिक तज्ज्ञांची मदत घेतली जात आहे. या प्रकरणात आतापर्यंत मिळालेल्या प्रश्नांच्या यादीपैकी ७७ प्रश्न प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतील प्रश्न आणि पर्यायांसह हुबेहूब जुळल्याचे तपासात समोर आले.
गुन्हे शाखेच्या तपासात आता प्रश्नपत्रिका नेमकी कोणत्या टप्प्यावर बाहेर पडली, ती कोणाच्या माध्यमातून पुढे गेली आणि त्यासाठी किती पैशांचा व्यवहार झाला, यावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
खाडीत फेकलेला लॅपटॉप हाती
नकाते यांनी हा लॅपटॉप वाशी खाडीत फेकला असावा, असा पोलिसांचा संशय होता. पोलिसांनी शोधमोहीम राबवून तो हस्तगत केला. लॅपटॉपमधील डेटा, हार्डडिस्क किंवा अन्य डिजिटल माहिती पुनर्प्राप्त करता येते का, याची तपासणी सुरू आहे. त्यातून प्रश्न तयार करण्याची प्रक्रिया, फाइल्सचा वापर, त्यांची निर्मिती किंवा हस्तांतरण याबाबत महत्त्वाचे पुरावे मिळण्याची शक्यता आहे.
२९४ प्रश्नांपैकी ७७ प्रश्न तसेच त्यांचे पर्यायही तंतोतंत जुळल्याचे आढळले. यामुळे प्रश्नपत्रिका फुटल्याचा पोलिसांचा संशय आणखी बळावला आहे. प्रश्नांची ही यादी परीक्षेपूर्वी कोणाकडे होती आणि ती तयार करणाऱ्या व्यक्तींपर्यंत ती कशी पोहोचली, याचा तपास सुरू आहे.
पार्किंगमध्ये पैशांची देवाणघेवाण?
प्रवीण पाटील आणि ऋतुजा पाटीलचे वडील अमृत पाटील यांच्यात १२ लाख रुपयांचा व्यवहार ठरल्याचा पोलिसांचा संशय आहे. यापैकी १० लाख रुपये एमपीएससीतील अधिकाऱ्यांना देण्यासाठी असल्याचे तपासात पुढे आले आहे. पहिल्या टप्प्यातील पाच लाख रुपये एमपीएससी कार्यालयाच्या पार्किंग परिसरात एका अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. या व्यवहाराची पुष्टी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि आर्थिक व्यवहारांची माहिती तपासली जात आहे.
कौटिल्य ॲकॅडमीतील डायरी पोलिसांच्या हाती
नंदूरबारमधील कौटिल्य ॲकॅडमीच्या झडतीत आर्थिक व्यवहारांची नोंद असलेली डायरी पोलिसांच्या हाती लागली आहे. या डायरीतील नावे, रकमा आणि तारखांची पडताळणी केली जात आहे.