मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) तयारी करणाऱ्या लाखो स्पर्धा परीक्षा परीक्षार्थींसाठी राज्य सरकारने आणखी एक आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेच्या पदसंख्येत मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, आता तब्बल १६ हजार ७१७ पदांसाठी ही महाभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. या निर्णयामुळे हजारो सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय सेवेत दाखल होण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
काही दिवसांपूर्वी आमदार विक्रम पाचपुते यांच्या अध्यक्षतेखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पदसंख्या वाढवण्याबाबत सविस्तर चर्चा केली होती. या भेटीदरम्यान स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आणि परीक्षार्थींच्या भावना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्या होत्या. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी पदसंख्येत सकारात्मक वाढ करण्याचे ठोस आश्वासन शिष्टमंडळाला दिले होते. त्यानुसार अखेर पदसंख्या वाढीचा मार्ग मोकळा करत मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांना दिलेला शब्द पाळला आहे.
या सुधारित पदसंख्येमुळे पात्र उमेदवारांना नव्याने अर्ज दाखल करण्याची तसेच पदांचे पसंतीक्रम (विकल्प) सादर करण्याची संधीही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना यापूर्वी अर्ज करता आला नव्हता किंवा ज्यांना आपल्या पसंतीक्रमात बदल करायचे आहेत, त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. या संदर्भातील सविस्तर वेळापत्रक आणि अधिकृत सुधारित अधिसूचना लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाईल.
शासनाच्या या ऐतिहासिक पदवाढीच्या निर्णयाचे राज्यभरातील स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांकडून जोरदार स्वागत होत असून, विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.