MPSC Drug Inspector Paper Leak | एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीची साखळी उलगडणार? 
मुंबई

MPSC Drug Inspector Paper Leak | एमपीएससी औषध निरीक्षक पेपरफुटीची साखळी उलगडणार?

दोन उमेदवार, दोन मध्यस्थ जाळ्यात; ११ जण अटकेत

अरुण पाटील

मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) औषध निरीक्षकपदाच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) साजिद संदे, विजय किंगर, संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम यांना अटक केली आहे. यापैकी संदे आणि किंगर हे उमेदवार असून त्यांनी गैरमार्गाने प्रश्नसंच मिळविल्याचा आरोप आहे. तर, खलाटे आणि कदम यांनी प्रश्नसंच उमेदवारांपर्यंत पोहोचविण्यात मध्यस्थी केल्याचा पोलिसांचा संशय आहे. या कारवाईनंतर प्रकरणातील अटक आरोपींची संख्या ११ झाली आहे.

गोपनीय कक्षातून प्रश्नसंच बाहेर काढल्याचा तपास

अन्‍न व औषध प्रशासन विभागातील औषध निरीक्षक (गट-ब) संवर्गातील १५४ पदांसाठी २२ मार्च २०२६ रोजी राज्यातील सहा केंद्रांवर चाळणी परीक्षा घेण्यात आली होती. परीक्षेपूर्वीच एमपीएससीच्या गोपनीय कक्षातील तज्ज्ञांनी तयार केलेल्या प्रश्नसंचाच्या प्रती अनधिकृतपणे बाहेर काढून आर्थिक फायद्यासाठी त्यांची देवाणघेवाण झाल्याचे तपासात समोर आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तपासाचा मुख्य रोख आता गोपनीय कक्षातून प्रश्नसंच नेमका कोणी बाहेर काढला, तो कोणाकडे गेला आणि उमेदवारांपर्यंत पोहोचविताना पैशांचा व्यवहार कसा झाला, यावर आहे. आरोपींच्या चौकशीत या साखळीतील आणखी नावे समोर येण्याची शक्यता आहे.

नव्याने अटक केलेल्या साजिद संदे आणि विजय किंगर यांनी बेकायदेशीर मार्गाने प्रश्नसंच मिळविल्याचा आरोप आहे. साजिदला सोलापूर जिल्ह्यातील सांगोला परिसरातून तर विजय किंगरला बुलडाणा येथून अटक करण्यात आली आहे. तर, संदीप खलाटे आणि भैरवनाथ कदम यांना नवी मुंबईतून अटक करण्यात आली.

आधीच्या सात आरोपींमुळे धागा मिळाला

यापूर्वी एमपीएससीचे अवर सचिव अभिजित लेंढवे, सहायक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकाटे, सहायक कक्ष अधिकारी गोपाळ मराठे, कौटिल्य ॲकॅडमीचे संचालक प्रवीण पाटील, मध्यस्थ अमृत पाटील, लोकेश ऊर्फ गौरव पाटील आणि उमेदवार ऋतुजा पाटील यांना अटक झाली आहे.

ऋतुजाला पेपर मिळाल्याचा तपासातील दावा

या प्रकरणातील उमेदवार ऋतुजा पाटील हिने प्रश्नसंच मिळवल्याचा आणि परीक्षेत संशय येऊ नये म्हणून १० प्रश्न जाणीवपूर्वक चुकीचे सोडविण्याचा सल्ला तिला देण्यात आल्याचा पोलिसांचा दावा आहे. ती या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत सातव्या क्रमांकावर होती, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.

पैशांचा माग काढण्यावर भर

प्रश्नसंचाच्या बदल्यात कोणाकडून किती रक्कम घेण्यात आली, ती रक्कम कोणामार्फत पुढे पाठविण्यात आली आणि या व्यवहारात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे. अटक आरोपींचे मोबाईल फोन व अन्य डिजिटल साधनांची तपासणीही केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT