Devendra Fadnavis
गट 'क' च्या सर्व परीक्षा MPSC घेणार अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली.  file photo
मुंबई

मोठी बातमी! यापुढे गट 'क' च्या सर्व परीक्षा MPSC घेणार

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : राज्याच्या सर्व विभागातील गट 'क' पदांसाठीच्या सर्व परीक्षा यापुढे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएसी) घेतल्या जातील, अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.१) विधानसभेत केली. पेपरफुटीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार सुरू असून यापुढच्या टीसीएसकडून घेतल्या जाणाऱ्या सर्व परीक्षा टीसीएसच्या केंद्रांवरच होतील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

पेपरफुटी प्रकरणातील आरोपीला १० वर्षाच्या शिक्षेचा निर्णय घ्या

विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे. पेपरफुटीच्या मुद्द्यावर विधानसभेत आज चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यात कोणतीही परीक्षा झाली तरी त्यात घोटाळा होतो. त्यामुळे पेपरफुटी प्रकरणातील आरोपींना १० वर्षाची शिक्षा झाली पाहिजे असा निर्णय घ्यावा, अशी मागणी केली. स्पर्धा परीक्षांमध्ये पेपर फुटीचे प्रकार होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तलाठी परीक्षेत विद्यार्थ्यांना जितके गुण मिळायला पाहिजेत, त्यापेक्षा जास्त मिळालेत. यामध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला. लाखो हुशार विद्यार्थ्यांना डावलून पेपरफुटी सारख्या प्रकरणातून पास होण्याचे प्रमाण वाढले आहे. मेहनती विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे. सरकार मात्र कठोर कारवाई करत नाही, असा आरोप थोरात यांनी केला.

यापुढे सर्व परीक्षा टीसीएस केंद्रांवरच

बाळासाहेब थोरात यांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. पेपरफुटीचा प्रश्न गंभीर आहे. टीसीएस स्वत:च्या केंद्रांवरच परीक्षा घेते, पण विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने बाहेरील केंद्रांवर परीक्षा घेतली होती. यापुढच्या परीक्षा मात्र टीसीएसकडून आपल्या केंद्रांवरच घेण्याचा निर्णय घेतला आहे. तलाठी भरतीमध्ये पेपर फुटला नाही, तर पेपरच उत्तर चुकलं. जी उत्तराची पद्धत असते त्यामध्ये चुक झाली. जर उत्तर चुकलं असेल तर नियमानुसार सगळ्यांना समान गुण दिले जातात. पण नंतर तो पेपर रद्द केला, असे फडणवीस यांनी सांगितले.

७७ हजार ३०५ उमेदवारांना राज्यसरकारकडून नोकरी

राज्यसरकारने ७५ हजार पदांची नोकर भरती घोषीत केली होती. पण सरकार आल्यानंतर आतापर्यंत ७७ हजार ३०५ उमेदवारांना कुठल्याही घोटाळ्याविना नोकरी दिली. ५७ हजार ४५२ विद्यार्थ्यांना नियुक्त्या दिल्या आहेत. तर ज्यांची परीक्षा झालेली असून फक्त नियुक्ती राहिली असे १९ हजार ८५३ उमेदवार आहेत. तसेच ३१ हजार २०१ पदांची परीक्षा सुरू असल्याची माहिती फडणवीस यांनी सभागृहात दिली.

SCROLL FOR NEXT