मुंबई

MP Varsha Gaikwad : सत्ता आल्यास मुंबई प्रदूषणमुक्त करणार

मुंबई काँग्रेसचा वायू प्रदूषणाचा जाहीरनामा प्रसिद्ध; सत्ताधाऱ्यांवर आरोप

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Congress' Mission - Wipe Out Pollution

मुंबई : महानगरपालिकेत सत्ता आल्यास मुंबई प्रदूषणमुक्त करण्याचा दावा मुंबई काँग्रेसने केला आहे. रविवारी ३० नोव्हेंबर रोजी मुंबईतील वायू प्रदूषणाबाबतचा जाहीरनामा काँग्रेसने प्रसिद्ध केला. यात मुंबईत गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या वायू प्रदूषणाला सत्ताधारी जबाबदार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

मुंबईत रस्त्याचे काँक्रीटीकरण मोठ्या प्रमाणात होत आहे. बांधकामे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत. दुसरीकडे झाडांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात येत आहे. मुंबईची हवा अत्यंत खराब झाली असून, अतिप्रदूषित शहरांच्या श्रेणीत मुंबईचा नंबर लागतो, असे या जाहीरनाम्यात म्हटले आहे.

मुंबईमध्ये वाढणारे प्रदूषण हे ठेकेदार व बांधकामदार, निष्क्रिय आणि जनतेच्या वेदनांबद्दल उदासीन असलेल्या सरकारचे अपयश आहे. महायुती सरकारने मुंबईच्या हवेत विष कालवले असून मुंबईकरांचे जीवन आणि शहराचे भविष्य धोक्यात आणत आहे. मुंबई काँग्रेस मुंबईकरांच्या स्वच्छ हवेच्या मूलभूत अधिकारासाठी लढणार आहे, असेही जाहीरनाम्यात म्हटले आहे.

मुंबईतील प्रदूषण अत्यंत वाईट पातळीवर गेले असून श्वसनाचे आजार वाढत आहेत. मुंबईकरांना स्वच्छ हवादेखील मिळत नाही. मुंबईची हवा विषारी होणे हा निसर्गाचा दोष नाही तर भ्रष्ट, बेजबाबदार आणि संधीसाधू सरकारचे दुर्लक्ष, निष्काळजीपणा आणि प्रयत्नांच्या अभावाचा परिणाम आहे. काँग्रेस सत्तेत आल्यावर मुंबईकरांच्या श्वासाचा हक्क आम्ही मनपाच्या पहिल्याच दिवशी सुरक्षित करू, असे मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यावेळी म्हणाल्या. यावेळी यू. बी. व्यंकटेश आणि सचिन सावंत यांनीही प्रदूषणावर नियंत्रण आणले पाहिजे व काँग्रेस त्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले.

जाहीरनामा प्रसिद्ध करतेवेळी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव यू. बी. व्यंकटेश, आमदार अस्लम शेख, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत, आमदार अमिन पटेल, आ. डॉ. ज्योती गायकवाड, जाहीरनामा समितीचे अध्यक्ष माजी आमदार मधू चव्हाण, उपाध्यक्ष प्रणील नायर, प्रवक्ते सुरेशचंद्र राजहंस, अखिलेश यादव, हरगून सिंह, जिल्हा अध्यक्ष कचरू यादव, अर्शद आझमी, भावना जैन, केतन शाह, राजपती यादव आदी उपस्थित होते.

काँग्रेसचा वायू प्रदूषणाचा जाहीरनामा

  • स्वच्छ हवा मुंबईकरांचा मूलभूत हक्क

  • हवेच्या गुणवत्तेच्या निरीक्षणासाठी प्रदूषण हॉटस्पॉट्स असलेल्या जागी सेन्सर्स मशीन लावणार

  • पुढील ५ वर्षांत गुणवत्ता ४० ते ६० या सुरक्षित पातळीवर आणणार.

  • वॉर्ड, चौक, बसस्थानके, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशनवर मोठे डिस्प्ले.

  • तासागणिक अपडेट्स ऑनलाईन व मोबाईल अॅपवर उपलब्ध.

  • बंद पडलेले सेन्सर्स २४ तासांत दुरुस्त केले जातील.

  • वॉर्डनिहाय प्रदूषणाचे स्त्रोत सार्वजनिकपणे ऑनलाईन जाहीर.

  • प्रत्येक वॉर्डसाठी प्रदूषण नियंत्रण कृती आराखडा तयार करणार.

  • बांधकाम प्रदूषणावर कठोर नियंत्रण, बांधकाम आणि सार्वजनिक प्रकल्पांसाठी कठोर प्रदूषण नियंत्रण मानक तयार करून त्याची कठोर अंमलबजावणी केली जाईल.

  • प्रत्येक बांधकाम प्रकल्पावर फवारणी, हिरवी नेट लावणे, गाड्या धुणे, धूळ संकलन प्रणाली अनिवार्य करणे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT