मुंबई : सरकारने हिंदी सक्तीचा निर्णय रद्द केल्यानंतर आज (दि.5) राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एका मंचावर येत आहेत. वरळी डोममध्ये ऐतिहासिक मेळावा पार पडत आहे. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला.
यावेळी बोलताना खासदार राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री फडणवीसांचा जन्म देखील झाला नव्हता तेव्हापासून 'शिवसेना' आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी संघर्षातून शिवसेना उभी केली. संघर्षाचा अभ्यास फडणवीस यांनी करणं गरजेचं आहे. होय आम्ही मराठी माणसाला महाराष्ट्रात सन्मानाने जगता यावं यासाठी गुंडगिरी केली. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतांना त्यांनी हेच केले, म्हणूनच तुम्ही आज मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसला असल्याचा टोला राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.
शिंदे हे मंत्रिमंडळातील अत्यंत कच्च मडकं आहे. शहा बडोद्याला गेल्यावर जय महाराष्ट्र म्हणत नाहीत. गुजरात-महाराष्ट्र एकच होता, गायकवाड हे मराठा संस्थान होतं. गुजरात, उत्तर प्रदेश मध्य प्रदेश हे मराठा संस्थान असल्याचेही ते म्हणाले. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयावर कमीत कमी भाष्य केले तरच त्यांचा मान असल्याचेही राऊत यांनी म्हटले आहे.
मेळाव्याची रुपरेषा सांगताना खासदार राऊत म्हणाले की, आम्ही संघर्ष केला, सरकारनं माघार घेतली. मेळाव्याला सकाळी ११.३० वाजता सुरूवात होईल. सुरूवातीला महाराष्ट्रचं राज्यगीत होईल. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लोक कालपासूनच येत आहेत आजही मोठ्या संख्येने कार्यकर्ते या कार्यक्रमाला येतील. राज आणि उद्धव ठाकरे हे दोन नेते आणि दोन भाऊ एकाच मंचावर येऊन मराठी माणसाला आणि महाराष्ट्राला दिशादर्शन करतील. मंचावर काय घडतंय ते लोकांना प्रत्यक्ष पाहूद्या. आज संपूर्ण महाराष्ट्र एक रोमांचक सोहळा अनुभवेल, असेही राऊत म्हणाले.