मुंबई: निवडणूक प्रक्रियेत नियमांचे उल्लंघन होत असल्याचा गंभीर आरोप करत खासदार मिलिंद देवरा यांनी राज्य निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. या पत्रात त्यांनी निवडणुकीच्या उमेदवारी अर्जांवर करण्यात आलेल्या डिजिटल स्वाक्षरीवर आक्षेप नोंदवला आहे.
देवरा यांनी म्हटले आहे की, अनेक राजकीय पक्षांनी उमेदवारीसाठी आवश्यक असलेले ए आणि बी फॉर्म भरताना नियमबाह्य पद्धतीने डिजिटल स्वाक्षरीचा वापर केला आहे. निवडणूक नियमांनुसार उमेदवारी अर्जांवर प्रत्यक्ष स्वाक्षरी आवश्यक असताना डिजिटल स्वाक्षरी करणे हे स्पष्टपणे नियमबाह्य आहे.
या पार्श्वभूमीवर, ज्या उमेदवारांनी उमेदवारी अर्जांवर डिजिटल स्वाक्षरी केली आहे, अशा सर्व उमेदवारांचे अर्ज तत्काळ रद्द करण्यात यावेत, अशी मागणी खासदार मिलिंद देवरा यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता आणि कायदेशीरता राखण्यासाठी आयोगाने याबाबत तातडीने योग्य निर्णय घ्यावा, असेही त्यांनी पत्रात नमूद केले आहे.