मुंबई : अदानी समूहाकडून साकारण्यात येणारा देशातील सर्वांत मोठा पुनर्विकास प्रकल्प म्हणून नोंद होत असलेले गोरेगावचे मोतीलालनगर हे ‘पंधरा मिनिटांचे शहर’ म्हणून मुंबईत ओळखले जाईल. कारण, तिथे रहिवाशांना सर्व सोयी-सुविधा पंधरा मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध असतील आणि महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तब्बल 1600 चौरस फूट चटई क्षेत्रफळ या प्रकल्पात रहिवाशांना दिले जाणार असून, मुंबईच्या पुनर्विकास प्रकल्पांच्या इतिहासात हा उच्चांक होय.
गोरेगावच्या (पश्चिम) गणेश मैदान येथील मोतीलाल नगर 1, 2 व 3 या वसाहतींच्या पुनर्विकास प्रकल्पाच्या बृहतआराखड्याचे (मास्टर प्लॅन) सादरीकरण म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी शुक्रवारी स्थानिक रहिवाशांपुढे केले. 1600 चौरस फूट चटई क्षेत्रफळाची येथील रहिवाशांना घरे दिली जावीत, असा प्रस्ताव म्हाडाने राज्य शासनाकडे पाठवल्याची माहिती जयस्वाल यांनी दिली. सूत्रांच्या माहितीनुसार, हा प्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र?फडणवीस यांनी तत्वत: मान्य केला आहे.
किमान 2 हजार चौरस फुटांचे घर द्यावे अशी येथील रहिवाशांची मागणी आहे. मात्र जयस्वाल यांनी सांगितले की, या प्रकल्पाच्या शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे 1600 चौरस फूट बांधकाम क्षेत्रफळाची घरे दिली जाणार आहेत. या क्षेत्रफळाचे विभाजन करून प्रत्येकी 800 चौरस फुटांचे दोन 2 बीएचके फ्लॅट घेण्याचा पर्यायही रहिवाशांकडे असेल. या प्रकल्पांतर्गत 3 हजार 702 पात्र रहिवाशांना 1600 चौरस फूटांची सदनिका विनामूल्य देण्यात येणार आहे. शिवाय, 328 पात्र व्यावसायिकांना 987 चौरस फूट क्षेत्राचे व्यावसायिक गाळे देण्यात येणार आहेत. सुमारे 1600 झोपडीधारकांना एसआरए कायद्यान्वये 300 चौरस फूट क्षेत्राची घरे देण्याचे नियोजन आहे. या पुनर्विकासाअंतर्गत म्हाडाला देखील मोठ्या प्रमाणात गृहसाठा उपलब्ध होणार आहे.
सर्व सोयींनी युक्त नगर
शाळा, दवाखाने, रुग्णालय, बाजारपेठ, व्यावसायिक संकुल, हिरवळीने नटलेली उद्याने, ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष विश्रांती क्षेत्रे, खेळाची मैदाने, जॉगिंग पार्क, सायकल ट्रॅक, सांस्कृतिक सभागृह, जिमखाना यांसारख्या सुविधा सर्व रहिवाशांना 15 मिनिटांच्या अंतरावर उपलब्ध होतील. 15 एकर जागेवर हरित पट्ट्याचे नियोजन करण्यात आले आहे. बहुमजली पार्किंग व्यवस्था, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, पावसाच्या पाण्याचे संधारण, सौरऊर्जेचा वापर, स्मार्ट सुरक्षा यंत्रणा, अग्निसुरक्षा व्यवस्था आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञानाचा समावेश करण्यात येणार आहे.
* 1960 च्या दशकामध्ये गोरेगाव परिसरात मोतीलाल नगर नावाची ही वसाहत उभारण्यात आली होती. मुंबई उपनगराच्या मध्यवर्ती ठिकाणी 143 एकर क्षेत्रफळावर विस्तारलेला हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे.
* सुमारे दोन दशकांपासून प्रलंबित राहिलेल्या या प्रकल्पाला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने गती व दिशा मिळाली आहे.”
* हा प्रकल्प केवळ निवासापुरता मर्यादित न राहता ‘लीव्ह, वर्क अँड प्ले’ या संकल्पनेवर आधारित एक संपूर्ण जीवनशैली प्रदान करणारा ठरणार असून, त्या दृष्टीने पंधरा मिनिटांचे नगर म्हणून मोतीलाल नगर विकसित केले जाईल.