मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळात राज्यात सर्वात अधिक पेपरफुटीचे प्रकार झाले असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. आम्ही इतक्या परीक्षा घेतल्या त्याचा सगळा रिपोर्ट कार्ड अधिवेशनात मांडणार आहोत. तसेच महायुती सरकारवर चिखलफेक करणार्यांचा कोरोना काळातील ‘बॉडी बॅग’ खरेदी आणि खिचडी घोटाळा पावसाळी अधिवेशनात काढला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या चहापान कार्यक्रमानंतर सह्याद्री अतिथीगृहात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षाने प्रथेप्रमाणे चहापानावर बहिष्कार टाकत आम्हाला दिलेले पत्र नरेटिव्ह तयार करण्यासाठी दिले आहे. लोकसभा निवडणुकीत संविधान बदलणार असल्याची अफवा सोडून थोडी मते मिळविलेले विरोधक आता खोटेच बोलायचे अशा मानसिकतेत गेले आहेत. मात्र, पावसाळी अधिवेशनात त्यांचा आम्ही पर्दाफाश केल्याशिवाय सोडणार नाही. आम्हाला मनुस्मृतीबाबत पत्र देणार्यांनी आरशात आपला चेहरा पाहिला पाहिजे.
महाविकास आघाडी सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विदर्भातील सिंचनाचे प्रकल्प मार्गी लावण्यात अपयश आले होते. नवीन सरकार आल्यावर आम्ही केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला. गुंतवणुकीत त्यांच्या काळात 3-4 नंबरवर गेलेला महाराष्ट्र आमच्या काळात नंबर वनवर आलेला आहे. विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्याची आमची तयारी आहे. पण, आधी त्यांनी आमच्यासमोर सभागृहात बसले पाहिजे, असे आव्हानही त्यांनी दिले.
ते म्हणाले, विरोधकांकडून राज्यात नरेटीव्ह वातावरण तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आजही त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना एक पत्र दिले आहे. त्या पत्राची सुरुवातच त्यांनी मनुस्मृतीतील श्लोकाच्या मुद्द्यावर केली. पण, त्याची काही गरज नव्हती. सरकार कोणत्याही पुस्तकात मनुस्मृतीमधील एखादा धडा शालेय पुस्तकात समावेश करणार नाही.