नवी मुंबई: संभाव्य ‘एल-निनो’ च्या पार्श्वभूमीवर यंदा मारबे धरण क्षेत्रात 3,327 मिमी इतक्या पावसाचा आंदाज आहे. त्यामुळे मोरबे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता कमी असल्याने आता आहे तो पाणीसाठा जपून वापरण्याची गरज असल्याचे निवेदन नवी मुंबईचे महापौर डॉ. कैलास शिंदे यांनी महासभेत केले आहे.
यावेळी त्यांनी पाणीपुरवठ्यासह स्वच्छ सर्वेक्षण, धोकादायक इमारतींवरील कार्यवाही, मतदार याद्यांचे पुनरावलोकन आणि जनगणना आदी महत्त्वाच्या उपक्रमांमध्ये नागरिकांचा सक्रिय सहभाग मिळवण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, असेही आवाहन केले.
महापौर म्हणाले, नवी मुंबईला मोरबे व बारवी धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. मोरबे धरणाची एकूण साठवण क्षमता 190.890 एमसीएम असून सध्या धरणात 82.557 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 43.24 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे.
यामधील एक महिन्याचा राखीव साठा वगळता प्रत्यक्ष वापरासाठी 51.957 एमसीएम (27.22 टक्के) पाणी उपलब्ध आहे.
सध्याच्या दैनंदिन गरजेनुसार हा साठा 7 ऑगस्ट 2026 पर्यंत म्हणजेच सुमारे 103 दिवस पुरू शकतो. त्यामुळे पाणी कपातची गरज नाही. मात्र, ‘एल-निनो’मुळे यावर्षी सरासरी पर्जन्यमान 92 ते 94 टक्क्यांपर्यंत राहण्याचा अंदाज आहे.
2007 ते 2025 या कालावधीत मोरबे धरण क्षेत्रात सरासरी 3617 मिमी पाऊस नोंदला गेला असून धरण पूर्ण भरण्यासाठी साधारण 3500 मिमी पावसाची आवश्यकता असते. मात्र, यंदा 3327 मिमी इपावसाचा अंदाज आहे. त्यामुळे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता कमी आहे.
यामुळे यंदाच्या पाणीसाठ्याबरोबरच पुढील वर्षाचा विचार करून पाणी नियोजन आताच करावे लागणार आहे. नागरिकांनीही पाणी बचतीला प्राधान्य देणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
पिण्याचे पाणी बचतीची हे करा...
वाहन धुण्यासाठी पिण्याचे पाणी वापरणे टाळा
पाण्याच्या टाक्या भरून वाहणार नाहीत याची दक्षता घ्या
पाण्याचे महत्त्व ओळखून काटकसरीने पाणी वापर करा