Mumbai beach pollution pudhari photo
मुंबई

Mumbai beach pollution : मुंबईतील चौपाट्या बनल्या कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड !

मुंबई महानगरपालिकेच्या कचरा रोखण्याच्या सर्व उपाययोजना अयशस्वी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबई शहराला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. परंतु कचरा रोखण्याच्या सर्व उपाययोजना फेल झाल्यामुळे पावसाळ्यात समुद्र किनारे कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड बनत आहेत. दररोज सरासरी ३०० ते ३५० मॅट्रिक टनपेक्षा जास्त कचरा भरतीच्यावेळी पाण्याबरोबर किनाऱ्यावर फेकला जात आहे. यात एकट्या जुहू चौपाटीवर १५० मेट्रिक टन कचरा जमा होतो. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेची डोकेदुखी वाढली आहे.

मुंबईतील समुद्रकिनारे अनेक पर्यटकांना नेहमीच खुणावत असतात. मुंबई भेटीवर असलेला देशी, विदेशी पर्यटक शहरातील गिरगाव, दादर, खार, जुहू, सात बंगला, वेसावे मार्वे व अन्य चौपाट्यांना आवर्जून भेट देतो. अनेकजण पावसाची मजा लुटण्यासाठी समुद्रकिनारी फेरफटका मारण्यासाठी येतात. पण काही वर्षांपासून पावसाळ्यात समुद्रकिनारे कचऱ्याचे डम्पिंग ग्राउंड होत आहेत.

मुंबईकरांनी केलेला कचरा नाल्यावाटे थेट समुद्रात जाऊन मिळतो. परंतु समुद्र आपल्या पोटात कचरा ठेवत नसल्यामुळे तो भरतीच्या वेळी बाहेर फेकतो. त्यामुळे संपूर्ण चौपाटीवर कचऱ्याचा ढीग जमा होतो. मुंबई महापालिकेने अनेक उपाययोजना करूनही समुद्रात जाणारा कचरा रोखण्यात फेल ठरली आहे. त्यामुळे पावसाळ्यात पर्यटकांना समुद्रकिनाऱ्यांना मुकावे लागत आहे. याची सर्वस्वी जबाबदारी केवळ महापालिकेची नसून मुंबई अस्वच्छ करणाऱ्या मुंबईकरांचीही आहे.

मुंबईतील नदी, नाल्यांमधून वाहून येणारा तरंगता कचरा थेट समुद्रात जाऊ नये यासाठी नाल्याच्या शेवटच्या टप्प्यात ट्रॅश बूम लावण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी ट्रॅश बूमच्या सहाय्याने तीन महिन्यांत तब्बल १०,५०० क्यूबिक मीटर तरंगता कचरा अडवून संकलित करण्यात आला होता. आजही अशा प्रकारे कचरा अडवला जात असला तरी, हजारो मेट्रिक टन कचरा समुद्रात जातच आहे.

हा कचरा रोखण्यात आजवर महापालिकेला यश आलेले नाही. जलप्रदूषण रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या महापालिकेच्या प्रयत्नांमध्ये ट्रॅशबूमचा हा प्रयोग अतिशय मोलाचा ठरणार असून भविष्यात इतरही ठिकाणी ही उपाययोजना करण्याचा प्रशासनाचा मानस होता. परंतु या उपाययोजनेमुळे शंभर टक्के कचरा रोखणे शक्य न झाल्यामुळे महापालिकेच्या घनकचरा विभागाची डोकेदुखी वाढली आहे.

नालेसफाई होऊनही कचरा येतो कुठून ?

मुंबई शहरात दरवर्षी १५० कोटी रुपये खर्च करून नाले व नद्यांची साफसफाई करण्यात येते. मग समुद्रात जाणारा हजारो मेट्रिक टन कचरा येतो कुठून, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पालिकेने नालेसफाई केली तरी पाण्यावर तरंगणारा प्लास्टिक व अन्य हलका कचरा काढला जात नसल्यामुळे हा कचरा नाल्याला पूर आल्यानंतर थेट समुद्रात जात आहे. त्यामुळे १०० टक्के नालेसफाईचा दावा करणारी महापालिकाच याला जबाबदार असल्याचे स्पष्ट होते.

झोपडपट्टीमुळे कचऱ्याचे प्रमाण वाढले

मुंबईतील विविध नाल्यांच्या किनाऱ्याला मोठ्या प्रमाणात झोपडपट्टी वसली असून यात विविध छोटे मोठे कारखाने आहेत.या झोपडपट्टीतून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्या व अन्य कचरा थेट नाल्यात टाकण्यात येत असल्यामुळे हा कचरा पाण्यासोबत थेट समुद्राला जाऊन मिळतो. त्यामुळे कचऱ्याला झोपडपट्टीधारकही तितकेच जबाबदार आहेत.

नवीन उपाययोजनांचा शोध

जलप्रदूषण रोखून अधिकाधिक पर्यावरणपूरक उपाययोजना करण्यासाठी महापालिका प्रशासन प्रयत्न करीत आहे. मुंबईलगतचा समुद्र किनारा स्वच्छ राखणे, जलप्रदूषण होवू नये, मुंबईतील खारफुटीचे क्षेत्र प्‍लास्टिकमुक्‍त राखणे, प्‍लास्टिक आणि इतर तत्सम कचरा समुद्रामध्ये थेट वाहून न जाता त्यापूर्वीच तो संकलित करणे, त्‍याची योग्यरित्या विल्‍हेवाट लावणे यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून वेगवेगळ्या उपाययोजनांची चाचपणी करण्यात येत असल्याचे पालिकेच्या घनकचरा विभागाकडून सांगण्यात आले.

समुद्रकिनारे स्वच्छ ठेवण्यासाठी महानगरपालिका सतर्क

पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यावर साठणारा कचरा जमा करून त्याची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिका नेहमी सतर्क असते. प्रत्येक किनाऱ्यावर कचरा उचलण्यासाठी लागणारी यंत्रणा व सफाई कामगारांची नियुक्ती केली जाते. त्यामुळे समुद्रातून फेकला जाणारा कचरा रोजच्या रोज उचलला जातो, असे घनकचरा विभागाचे उपायुक्त किरण दिघावकर यांनी स्पष्ट केले.

उचललेला कचरा (९ ते १९ जुलै )

  • गिरगाव चौपाटी - ३३.६६ मेट्रिक टन,

  • दादर - माहीम - १५२.१० मेट्रिक टन

  • चिंबई - वारिंगपाडा - १२७.२० मे. टन

  • मढ - मार्वे - ४४. २८ मेट्रिक टन

  • जुहू - १,८२५ मेट्रिक टन

  • वेसावे - २७७.६० मेट्रिक टन

  • गोराई - ३८.८२ मेट्रिक टन

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT