Mumbai | अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 20 हजार कोटींच्या मदतीचा जीआर  
मुंबई

Mumbai | अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात; 20 हजार कोटींच्या मदतीचा जीआर

कृषिमंत्री भरणे यांची माहिती : केंद्राकडूनही मदतीची अपेक्षा

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यातील शेतकर्‍यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीपोटी राज्य सरकारने 20 हजार कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. या मदतीसाठीचा शासन निर्णय (जीआर) काढण्यात आला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या खात्यात मोठ्या प्रमाणात पैसे जमा होत आहेत, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी बुधवारी दिली.

कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले की, केंद्र सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी (एनडीआरएफ) च्या निकषांनुसार मदत करत असते. राज्य शासनाने नुकसानीची पाहणी करून याबाबतचा अहवाल केंद्राला सादर केला आहे. त्यामुळे लवकरच केंद्राकडूनही अतिरिक्त मदत जाहीर होण्याची अपेक्षा आहे. या प्रकरणी सरकारने जाहीर केलेली संपूर्ण रक्कम शेतकर्‍यांना दिली जाईल.

राष्ट्रवादीच्या जागा वाढण्यासाठी पक्षस्तरावर निर्णय

कृषिमंत्री भरणे यांनी यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांवरही भाष्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी पुण्यातील शिवाजीनगर येथील पक्ष कार्यालयात पुणे जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. याविषयी ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जागा कशा वाढतील, याबाबत सूचना घेण्यात आल्या. त्यावर अजित पवार अंतिम निर्णय घेतील. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जागा वाढवण्यासाठी आवश्यक ते निर्णय पक्ष पातळीवर घेतले जातील. सध्या प्रत्येक तालुक्यानुसार पक्षाचे कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांच्या भेटी सुरू आहेत.

कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर करुन निर्णय

कार्यकर्त्यांची मते जाणून घेऊन आणि विविध ठिकाणच्या भावना समजून घेऊन उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात येईल. कार्यकर्त्यांच्या भावनांचा आदर केला जाईल आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिक जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले जातील. काही ठिकाणी महायुती म्हणून भाजप आणि शिवसेनेसोबत स्थानिक पातळीवर युती केली जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

मुंढवा प्रकरणावर भाष्य करणे टाळले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा सहभाग असलेल्या मुंढवा येथील जमीन व्यवहाराच्या वादावर कृषीमंत्री भरणे यांनी भाष्य करणे टाळले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणी सविस्तर भूमिका मांडली असून, विरोधकांच्या आरोपांना त्यांनी उत्तर दिले आहे. पवार यांच्या स्पष्टीकरणानंतर माझ्या सारख्याने पुन्हा खुलासा करणे योग्य नाही, अशी सावध प्रतिक्रिया कृषिमंत्री भरणे यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT