सरसंघचालक मोहन भागवत 
मुंबई

Mohan Bhagwat | भारताला महाशक्ती नव्हे, विश्वगुरु व्हायचे आहे: सरसंघचालक मोहन भागवत

मुंबई येथे व्याख्यानाचे आयोजनः पुढारी वृत्तसमूहाचे चेअरमन आणि मुख्य संपादक डॉ. योगेश जाधव यांचा निमंत्रितात समावेश

पुढारी वृत्तसेवा

दिलीप सपाटे : भारत मोठा झाला तर अनेक स्वार्थी शक्तींचे स्वार्थी दुकान बंद होईल. याची कल्पना असल्यानेच जगातील अनेक देश आपल्याशी मैत्री करतात आणि वेळोवेळी शत्रुत्वही दाखवितात. जगाने महाशक्ती पाहिल्या आहेत. या महाशक्ती कशा पद्धतीने दंडुके चालवितात हेही जगाने पाहिले आहे. त्यामुळे भारताला अशी महाशक्ती बनायचे नाही. तर भारताला विश्वगुरू बनायचे आहे, असे प्रतिपादन सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मुंबई येथे सरसंघचालकांचे व्याख्यान आयोजित केले होते त्‍यावेळी ते बोलत होते.

मोहन भागवत यांच्या या व्याख्यानाला केवळ 1200 गण मान्य व्यक्तींना निमंत्रित करण्यात आले होते. पुढारी वृत्तसमूहाचे चेअरमन आणि मुख्य संपादक डॉ. योगेश जाधव यांचा या निमंत्रितात समावेश होता. त्याचबरोबर प्रसिद्ध उद्योगपती राधाकिशन दमाणी, अभिनेता हेमा मालिनी, अभिनेते सलमान खान, यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तिमत्‍वे या कार्यक्रमाला उपस्थित होते.

समजसंघटन हे संघाचे काम

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोणत्याही व्यक्ती, पक्ष किंवा संघटनेच्या विरोधात कार्य करीत नसून राष्ट्रनिर्मितीसाठीच आपले कार्य करतो. एखाद्या संस्थेचा प्रतिस्पर्धी म्हणून संघाची स्थापना झाली नाही. किंवा तत्कालीन घटनेची प्रतिक्रिया म्हणून कोणाच्या विरोधासाठीही संघाचा जन्म झाला नाही. संघ लोकप्रियता किंवा सत्तेसाठी कार्यरत नाही. बाह्यस्वरूपावरून संघाचे काम समजून घेता येणार नसल्याचे सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले.

संपूर्ण समाजाचे संघटन हेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम आहे. याशिवाय, संघाला दुसरे कोणतेच काम करायचे नाही. मात्र, समाजासमोर, देशासमोर अनेक प्रश्न असतात. त्यांची सोडवणूक करण्याचे काम स्वयंसेवक आपापल्या पातळीवर स्वतंत्रपणे आणि स्वायत्तपणे करत असतात. आजमितीला १ लाख ३० हजार सेवाकार्य स्वयंसेवकांच्या माध्यमातून सुरू आहेत. ती सेवाकार्ये स्वयंसेवकांची आहे, संघाची नाही. त्यावर, संघाचे नियंत्रण आहे किंवा संघ 'रीमोट कंट्रोल' आहे अशी बाहेर चर्चा होते. मात्र, संघ कोणाला नियंत्रित करत नाही, संघ कोणाचा रिमोट कंट्रोलही नाही. कोणावर नियंत्रण करण्यासारखा असा कोणता अधिकार आमच्याकडे आहे? संघाचे काम मैत्री आणि मनमर्जीवर चालते. समाजासाठी कोणी चांगले काम करत असेल तर त्या सर्वांना संघाची मदत होते. आता आमची एक शक्ती निर्माण झाली आहे त्यामुळे देशाबद्दल आमचा जो विचार आहे त्यानुसार कोणी काम करत असेल तर त्यांना साहजिकच आमची मदत होते. पण, कोणाला फायदा व्हावा म्हणून संघ काम करत नाही. तर, देशासाठी चांगले काम आहे म्हणून ते काम आम्ही करतो.

कोणताही नेता, घोषणा, धोरण, पक्ष, अवतार, सरकार, विचार, महापुरूष किंवा एखाद्या तत्वज्ञानामुळे देशाचे भाग्य बदलत नाही. हे सर्व घटक म्हणजे सहाय्यक बाबी आहेत. संपूर्ण समाजामुळेच एखाद्या देशाचा भाग्योदय शक्य आहे. कारण, समाजच आपल्यासाठी या घटकांची निर्मिती करतो. एका अर्थाने समाज हा मालक आहे. जर, मालक जागा असेल तर सर्व घटक नीट काम करत राहतात. समाजामुळे देशाचे परिवर्तन घडते. भारत मोठा झाला तर अनेक स्वार्थी शक्तींचे स्वार्थी दुकान बंद होईल. याची कल्पना असल्यानेच जगातील अनेक देश आपल्याशी मैत्री करतात आणि वेळोवेळी शत्रुत्वही दाखवितात. यावर सामर्थ्यसंपन्न भारत हाच उपाय आहे. त्यासाठी संघटीत आणि गुणवान समाज हवा. हा समाजही संपूर्ण हवा, कोणी मागे सुटता कामा नये. यासाठीच हिंदू समाजाचे संघटन करण्याचे काम घेऊन संघाचे काम अविरतपणे चालू आहे.

भाजप हा स्वतंत्र पक्ष

संघ म्हणजे काय, याची बाहेर अनेकदा चर्चा होते. आज नरेंद्र मोदी पंतप्रधान आहेत म्हणजे संघ, असेही पाहिले जाते. मोदी हे पंतप्रधान आहेत. भाजप नावाचा त्यांचा पक्ष आहे, तो स्वतंत्र आणि वेगळा आहे. त्या पक्षात अनेक स्वयंसेवक जरूर आहेत, ते अगदी प्रभावशालीही आहेत. पण म्हणून त्यांचा पक्ष म्हणजे संघाचा राजकीय पक्ष असा अर्थ होत नाही. त्यात संघाचे स्वयंसेवक आहेत, असेही भागवत यांनी याप्रसंगी सांगितले.

चांगले काम करणारा प्रत्येकजण स्वयंसेवक!

संपूर्ण समाज एक आणि गुणवान बनतो तेव्हाच देशाचा भाग्योदय होतो, हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पहिला सिद्धांत आहे. चांगले काम करणारा प्रत्येक जण स्वयंसेवक आहे असे आम्ही मानतो. संपूर्ण समाजाचे संघटन हेच संघाचे कार्य आहे. समाजसंघटनेच्या या प्रक्रियेतून कोणी सुटता कामा नये ही संघाची भावना आहे. त्यामुळे संघाच्या कार्याशी समाजातील प्रत्येक घटकाने जोडून घ्यावे, असे आवाहन मोहन भागवत यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT