मुंबई : लग्नाचे आमिष दाखवून महिलांना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचे, त्यांच्याशी जवळीक साधून आर्थिक आणि शारीरिक शोषण करायचे, असा आरोप असलेल्या मोहम्मद माझिन याला अखेर संयुक्त अरब अमिरातीमधून (यूएई) भारतात आणण्यात आले आहे.
महाराष्ट्र पोलिसांना हवा असलेला माझिन परदेशात पळून गेल्यानंतर त्याच्याविरोधात इंटरपोलची रेड नोटीस जारी करण्यात आली होती. केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय), परराष्ट्र मंत्रालय, केंद्रीय गृह मंत्रालय आणि महाराष्ट्र पोलिसांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली.
माझिन याने एका महिलेला लग्नाचे खोटे आश्वासन दिले. तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करून तिचे शारीरिक, मानसिक आणि आर्थिक शोषण केले. या महिलेकडून त्याने फसवणुकीने १८ लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणात संबंधित न्यायालयात आरोपपत्रही दाखल केले आहे. मात्र, तपासादरम्यान या प्रकरणाची व्याप्ती आणखी मोठी असल्याचे समोर आले. माझिन याने अशाच पद्धतीने आणखी १३ महिलांना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून पैसे घेतल्याचे तपासात उघड झाले. महिलांशी जवळीक साधल्यानंतर त्यांच्यासोबतच्या खासगी क्षणांचे व्हिडीओ चित्रित केल्याचाही आरोप आहे.