मुंबई : मराठी भाषेच्या संशोधनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत बोलीभाषांचे जतन आणि डिजिटल युगातील वापर वाढविण्यासाठी मुंबई विद्यापीठाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. विद्यापीठाच्या मायबोली अध्ययन व संशोधन केंद्र आणि मराठी भाषा विद्यापीठ, रिद्धपूर यांच्यात गुरुवारी सामंजस्य करार करण्यात आला. या करारामुळे मराठी भाषा, तिच्या विविध बोलीभाषा आणि भाषा तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात संयुक्त संशोधनाला चालना मिळणार आहे.
मराठी भाषा, साहित्य, लोकसंस्कृती, लोकपरंपरा आणि प्रादेशिक बोलीभाषांवर संशोधन प्रकल्प या कराराअंतर्गत राबविण्यात येणार आहेत. मराठीतील संदर्भग्रंथ निर्मिती, संशोधनपर लेखन, प्रकाशन आणि ज्ञाननिर्मिती या उपक्रमांमध्ये दोन्ही विद्यापीठे संयुक्तपणे काम करणार आहेत. त्यामुळे मराठी भाषेच्या संशोधनासाठी अधिक व्यापक शैक्षणिक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. केवळ पारंपरिक भाषाशास्त्रीय संशोधनापुरता हा करार मर्यादित नसून कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), नैसर्गिक भाषा प्रक्रिया (एनएलपी), भाषा तंत्रज्ञान, डिजिटल भाषा संसाधने आणि संगणकीय भाषाविज्ञान या आधुनिक क्षेत्रांमध्येही संशोधन केले जाणार आहे.
मराठी भाषेसाठी डिजिटल साधने विकसित करणे, संगणक आणि मोबाईलवरील वापर अधिक सक्षम करणे तसेच तंत्रज्ञानाशी सुसंगत भाषा संसाधने निर्माण करणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी आणि मराठी भाषा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. अविनाश आवलगावकर यांच्या उपस्थितीत हा करार झाला.
मराठी भाषेचे संशोधन राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्यासाठी हा करार महत्त्वाचा ठरेल, अशी माहिती मायबोली अध्ययन व संशोधन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. विनोद कुमरे यांनी दिली.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०च्या अनुषंगाने अभ्यासक्रम विकास, क्रेडिट ट्रान्सफर, डिजिटल अध्ययन साहित्याची निर्मिती, संशोधन प्रयोगशाळांचा वापर आणि शैक्षणिक संसाधनांची देवाणघेवाण यालाही या करारातून चालना मिळणार आहे. तसेच भारतीय ज्ञानपरंपरा, स्थानिक भाषिक वारसा आणि मराठीच्या लोप पावत चाललेल्या बोलीभाषांचे दस्तऐवजीकरण, संवर्धन आणि प्रसारासाठी विशेष प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.