राज्यातील शाळांमध्ये तिसरी भाषा म्हणून हिंदीची सक्ती करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले आहेत. ठाकरे बंधू भेटीच्या क्षणासाठी शिवसैनिक व मनसैनिक आतुरला आहे. मुंबई ठाकरेंचीच हे दाखवण्यासाठी 5 जुलैला होणारा मोर्चा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी दोन्ही सैनिकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. अशातच आता मुंबईत बॅनरबाजी बरोबरच सोशल मीडियावरही राज्य सरकारविरोधात मनसे सक्रीय झाली आहे. मनसे नेते गजानन काळेंनी एक्स पोस्ट करत भाजपला डिवचले आहे.
मनसे नेते गजानन काळे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत राज्य सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'हिंदीहृदयसम्राट'... अशी पोस्ट करत मराठीचे मारेकरी हिंदीचे सेवेकरी, चलो बच्चो अब हिंदी सीखनी है, असे व्यंगात्मक पोस्टर काळे यांनी शेअर केले आहे.
मनसे नेते गजानन काळे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करताच भाजपचे आमदार राम कदम यांनी याला सडेतोड प्रत्युत्तर दिले. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी हिंदीची सक्ती केली. त्यामुळे हिंदीहृदयसम्राट हा शब्द उद्धव ठाकरे याच्यासाठी योग्य आहे, असे प्रत्युत्तर राम कदम यांनी दिली आहे.
ठाकरे बंधू भेटीच्या क्षणासाठी शिवसैनिक व मनसैनिक आतुरला आहे. मुंबई ठाकरेंचीच..हे दाखवण्यासाठी 5 जुलैला होणारा मोर्चा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी दोन्ही सैनिकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.या मोर्चासाठी मुंबई शहर व उपनगरातील एका प्रभागातून किमान एक ते दीड हजार अशा 227 प्रभागातून अडीच ते साडेतीन लाख सर्वसामान्य मराठी माणूस सहभागी करण्याचे टार्गेट ठेवण्यात आले आहे. त्याशिवाय राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठी माणूस मुंबईत दाखल होणार आहे. हिंदी भाषासक्तीच्या विरोधात उद्धव ठाकरे व राज ठाकरे गेल्या 14 वर्षांनंतर एकत्र येत आहेत. त्यामुळे शिवसैनिक व मनसैनिकांमध्ये उत्साह दिसत आहे.या मोर्चात जास्तीत जास्त मराठी माणूस सहभागी व्हावा यासाठी सोशल मीडियासह प्रभागातील चौक, प्रमुख स्थळे, रेल्वे स्टेशन परिसर येथे जाहिरातबाजी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्यामुळे मनसे व शिवसेनेचे पदाधिकारी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, व्हॉट्सअॅप या माध्यमातून मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन करीत आहेत. विशेष म्हणजे ही पोस्ट करत असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह उद्धव व राज यांचे फोटो छापले जात आहेत.