MMRDA Metro 
मुंबई

MMRDA Metro Passengers - एमएमआरडीए मेट्रोतून ३० कोटी प्रवाशांचा प्रवास

MMRDA Metro Passengers - एमएमआरडीए मेट्रोतून ३० कोटी प्रवाशांचा प्रवास

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी वृत्तसेवा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) संचालित सर्व मेट्रो मार्गिकांनी एकत्रितपणे ३० कोटी प्रवाशांचा टप्पा गाठला आहे. ३ ऑगस्टला ही सर्वाधिक प्रवासी संख्या नोंदवली गेली. यात दहिसर पूर्व ते अंधेरी पश्चिम मेट्रो २अ, दहिसर पूर्व ते गुंदवली मेट्रो ७, डायमंड गार्डन ते मंडाळे मेट्रो २ब आणि दहिसर पूर्व ते काशीगाव मेट्रो ९ या मार्गिकांचा समावेश आहे.

या प्रवासी संख्येतील शेवटचे ५ कोटी प्रवासी अवघ्या १७९ दिवसांत नोंदवले गेले, जो मेट्रो सेवा सुरू झाल्यापासूनचा सर्वात कमी कालावधी आहे. या कालावधीत सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या २.७० लाखांवरून २.७९ लाखांपर्यंत पोहोचली असून, त्यात ३.३५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. शनिवार-रविवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि हंगामी प्रवासाचा परिणाम असूनही ही वाढ कायम राहिली आहे.

मेट्रो २ अ आणि ७ या मार्गिका २ एप्रिल २०२२ रोजी सुरू झाल्या. त्यानंतर १७ सप्टेंबर २०२२ पर्यंत ५० लाख प्रवाशांनी प्रवास केला होता. २७ जानेवारी २०२३ रोजी १ कोटी प्रवासीसंख्या पूर्ण झाली होती. २० सप्टेंबर २०२३ रोजी ५ कोटी तर २८ मे २०२४ रोजी १० कोटी प्रवाशांचा टप्पा पार झाला होता. ४ जानेवारी २०२५ पर्यंत १५ कोटी, ४ ऑगस्ट २०२५ पर्यंत २० कोटी प्रवाशांनी प्रवास केला होता. २०२६च्या सुरुवातीला पुन्हा एकदा प्रवासीसंख्या वाढू लागली.

५ फेब्रुवारीपर्यंत २५ कोटी आणि ३ ऑगस्टपर्यंत ३० कोटी प्रवाशांची नोंद झाली. मेट्रो मार्गिका २ब (टप्पा-१) आणि मेट्रो मार्गिका ९ (टप्पा-१) ७एप्रिल २०२६ रोजी सुरू झाल्यामुळे मेट्रो जाळ्यामध्ये ९ नवीन स्थानकांची भर पडली. शेवटचे ५ कोटी प्रवासी अवघ्या १७९ दिवसांत नोंदवले गेले. हा आतापर्यंतचा सर्वात वेगवान टप्पा आहे.

दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ

सरासरी दैनंदिन प्रवासी संख्या २.७० लाखांवरून २.७९ लाखांपर्यंत पोहोचली आहे. मागील टप्प्याच्या तुलनेत दैनंदिन प्रवासीसंख्येत ३.३३ टक्क्यांची वाढ झाली आहे. १० कोटी ते १५ कोटी प्रवाशांच्या टप्प्याच्या तुलनेत सध्याची दैनंदिन प्रवासीसंख्या २३ टक्क्यांहून अधिक वाढली आहे. पहिल्या ५० लाख प्रवाशांच्या टप्प्याच्या तुलनेत, सरासरी दैनंदिन प्रवासीसंख्या सुमारे ९.४ पट वाढली आहे.

ऐतिहासिक टप्पा गाठणे हा एमएमआरडीए आणि महामुंबई मेट्रोसाठी अत्यंत अभिमानाचा क्षण आहे. त्याहून महत्त्वाचे म्हणजे, हा टप्पा नागरिकांनी मेट्रो सेवांवर दाखवलेल्या वाढत्या विश्वासाचे प्रतीक आहे. दररोज सरासरी जवळपास २.८ लाख प्रवासी मेट्रोचा वापर करत आहेत. यावरून मेट्रो ही मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनल्याचे स्पष्ट होते.

- डॉ. संजय मुखर्जी, महानगर आयुक्त, एमएमआरडीए तसेच अध्यक्ष, महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT