Mumbai Municipal Corporation
मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या मृत्यूनंतर त्याच्या अविवाहित, विधवा व घटस्फोटित मुलींनाही कुटुंब निवृत्तीवेतन मिळणार आहे. यासाठी मुंबई महानगरपालिकेने आपल्या अधिनियमांमध्ये सुधारणा केली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मुंबई महानगरपालिकेनेही अविवाहित, विधवा, घटस्फोटित मुलींना कुटुंब निवृत्तीवेतन देण्याचा निर्णय घेतला आहे.
मानसिक किंवा शारीरिक विकलांगता असलेल्या मुलीव्यतिरिक्त, अविवाहित मुलीसाठी ती २४ वर्षे वयाची होईपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत तसेच विधवा किंवा घटस्फोटित असलेल्या व ती स्वतःची उपजीविका करत नाही अशा मुलींना कुटुंबनिवृत्त वेतन देण्यात येणार आहे. महापालिका कर्मचाऱ्याचा किंवा निवृत्तीवेतनधारकाचा आणि त्याच्या जोडीदाराचा मृत्यू झाल्यानंतर, मुलीच्या घटस्फोटाच्या दिनांकापूर्वी कुटुंबातील अन्य कोणत्याही पात्र सदस्यास कुटुंब निवृत्तीवेतन दिले जात असेल तर, कुटुंबातील कुटुंबनिवृत्ती वेतनाकरिता पात्र असल्याचे बंद किंवा मयत होण्यापूर्वी, अशा घटस्फोटित मुलीला कुटुंब निवृत्तीवेतन सुरु केले जाणार नाही, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. विधवा मुलीच्या बाबतीत, तिच्या पतीचा मृत्यू किंवा घटस्फोटित मुलीच्या बाबतीत पालिका कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकाच्य जोडीदाराच्या हयातीत घटस्फोट झाल्यास घटस्फोटाची कार्यवाही पालिका कर्मचारी व निवृत्तीवेतनधारकाच्या जोडीदाराच्या हयातीत सक्षम न्यायालयात दाखल केली असेल, परंतु त्यांच्या मृत्युनंतर घटस्फोट झाला असेल तर, घटस्फोटित मुलीला घटस्फोटाच्या दिनांकापासून कुटुंब निवृत्तीवेतन दिले जाणार आहे.