MLC Election 2026 Voting Live: विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी (दि. २३) मतदान होत आहे. 5 मतदार संघासाठी एकूण १८२ उमेदवार रिंगणार आहेत. पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि नागपूर विभागातील पदवीधर मतदारसंघ, तसेच अमरावती आणि पुणे विभागातील शिक्षक मतदारसंघांसाठी ही निवडणूक होत आहे.
पुणे पदवीधर मतदार संघातून महायुतीच्या डॉक्टर स्मिता योगेश जाधव या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यांनी सकाळी आपल्या मतदानाचा हक्क बजावला अन् सर्व सुशिक्षित मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन देखील केलं.
राज्यातील सर्व मतदान केंद्रावर गुरुवारी सकाळी मतदान कर्मचाऱ्यांसह मतदान साहित्य रवाना झाले. दुपारनंतर कर्मचाऱ्यांनी मतदान केंद्रावर सर्व तयारीस सुरुवात केली. सायंकाळपर्यंत बहुतांश मतदान केंद्रे सज्ज करण्यात आली असून शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी चार या वेळेत मतदान होणार आहे.
पुणे विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात सकाळी १० वाजेपर्यंत ८.७२ टक्के मतदान झालं असून शिक्षक मतदार संघ निवडणुकीसाठी सोलापुरात १० वाजेपर्यंत ११.४८ टक्के मतदान झालं आहे.
पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दौंड तालुक्यातील राहू येथील मतदान केंद्रावर आमदार राहुल कुल यांनी आपला पदवीधर मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली
विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मावळ तालुक्यात मतदानाला सुरुवात झाली आहे. दोन्ही मतदारसंघांत मिळून ३ हजार ४९९ मतदार असून, मतदानासाठी १२ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे.
मावळ तालुक्यात पदवीधर मतदारसंघासाठी २ हजार ६७९, तर शिक्षक मतदारसंघासाठी ८२० मतदार आहेत. पदवीधर मतदारसंघासाठी सात, तर शिक्षक मतदारसंघासाठी पाच मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये उत्साहात मतदान होत आहे. मतदान केंद्रावर मतदारांच्या रांगा असून महायुतीने सूक्ष्म नियोजन केल्याचं दिसत आहे.
मंत्री अतुल सावे हे मतदान करण्यासाठी शिशूविहार शाळा येथील मतदान केंद्रात दाखल.
पुणे पदवीधर मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार डॉक्टर स्मिता जाधव यांनी आज आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांनी मतदारांना देखील मोठ्या प्रमाणात बाहेर पडून मतदान करून आपला हक्क बजावावा असे आवाहन देखील केले आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात झाली असून सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे, या प्रक्रियेसाठी अकोला जिल्ह्यात १३ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. या केंद्रांवर एकूण ५ हजार ९४२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
गडचिरोली जिल्ह्यात पदवीधर निवडणुकीसाठी मतदानाला सुरुवात, 26 केंद्रांवर मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यात 13 हजार 608 पदवीधर मतदारांची नोंदणी, 9 हजार 310 पुरुष तर 4 हजार 298 महिला मतदार आहेत. नक्षलमुक्त गडचिरोलीतील पदवीधर निवडणुकीकडे लक्ष असणार आहे.
महाराष्ट्र विधान परिषदेच्या अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत आहे. अमरावती विभागातील पाच जिल्ह्यात 81 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली असून पस्तीस हजार 810 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. सकाळी आठ ते सायंकाळी चार वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहेत. या निवडणुकीत एकूण 26 उमेदवार असून यवतमाळ जिल्ह्यात 18 केंद्रावर 6932 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे एका मतदान केंद्रावर पाच याप्रमाणे अधिकारी कर्मचारी तैनात करण्यात आले आहे.