मुंबई : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तरुण कार्यकर्त्यांची फौज तयार केली जात असून या बळावर आमचा पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा उभारी घेईल, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला. सोमवारी पुढारी न्यूजच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त पुढारी न्यूजचे संपादक प्रसन्न जोशी यांनी विचारलेल्या प्रश्नांना शिंदे यांनी समर्पक उत्तरे दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाले असले, तरी हा पक्ष पुन्हा उभारी घेईल, असे शरद पवारांना वाटत आहे. त्यामुळे आमच्या पक्षात एकत्रपणाबाबतची कुठेही चर्चा नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येतील, हे जाणीवपूर्वक पसरवले जात आहे. अर्थात, यामागे कोण आहे, हे सर्वांना माहीत आहे. अजित पवार यांच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे दिली असती, तर विभाजन झाले नसते आणि लोकसभा निवडणुकीत नणंद-भावजय एकमेकींच्या विरोधात उभ्या राहिल्या नसत्या, असे आता बोलले जात आहे; पण आमच्या पक्षाचे नेते शरद पवार हे आपल्या सहकार्यांवरच अशा प्रकारची जबाबदारी सोपवतात, हे आतापर्यंतच्या अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झाले आहे, असे शिंदे म्हणाले.
माझ्यातील हे गुण पाहूनच त्यांनी मला पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद दिले असावे, असे ते म्हणाले. भाजपने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्तेसाठी विभाजन केले असले, तरी जनता हीच आमची ताकद आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राज्यातील जनता महायुती सरकारला जागा दाखविणार असल्याची खात्री पटेल, असे शिंदे यांनी सांगितले.
बारामती लोकसभा मतदारसंघातून भाजपने अजित पवार यांना जाणीवपूर्वक त्यांच्या पत्नी सुनेत्रा यांना निवडणुकीत उतरवण्यास भाग पाडले होते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत योगेंद्र पवार विरुद्ध अजित पवार असा सामना झाला. पक्ष म्हणून अशा प्रकारचा निर्णय घ्यावाच लागतो. पूर्वीचे राजकारण दिलदारपणाचे होते. आता चित्र वेगळे आहे. जो काम करेल तोच विजयी होईल. उदाहरणार्थ, कोल्हापूर खंडपीठासाठी पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव अनेक वर्षांपासून लढत होते, तर माधुरी हत्तिणीसाठी कोल्हापूरमधील जनता रस्त्यावर उतरली होती. याचा अर्थ जनतेच्या मनातील अशांतता ओळखता आली पाहिजे, असेही शिंदे यांनी सांगितले.
काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांना एका प्रवचनकाराने दिलेल्या धमकीकडे लक्ष वेधले असता शशिकांत शिंदे म्हणाले, हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आहे. यामुळे यापूर्वी देशाच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात विकासावर चर्चा होत असे. आता गेल्या काही वर्षांपासून धर्मावर चर्चा सुरू झाल्या आहेत, अशी खंत शिंदे यांनी व्यक्त केली. आमच्या पक्षाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मटण खाल्ल्याचा उल्लेख केला. यावरून कोणी काय खावे, हे ठरवण्यास सत्ताधार्यांनी सुरुवात केली. बाकीचे विषय संपले असे समजून अशा प्रकारच्या विषयांना वाट मोकळी करून दिली. इतकेच नाही, तर त्यासाठी शासकीय आदेशही काढून 15 ऑगस्ट रोजी अनेक महानगरपालिकांनी मटणबंदी केली; पण जनआक्रोश सुरू होताच आपण असा आदेश काढलाच नाही, असे सांगण्याची वेळ मुख्यमंत्र्यांवर आली. अशा प्रकारचे आदेश निघाले, तर समाजात दरी निर्माण होईल, अशी भीती शिंदे यांनी व्यक्त केली.
शरद पवार यांनी अनेकांना संधी दिली होती, तरीही ते पक्ष सोडून गेले. आताही इंदापूर आणि कोल्हापूर आमच्याकडेच असताना त्यावर आमचे विरोधक दावा करत आहेत. लोकसभा निवडणुकीत वातावरण चांगले होते; पण ते विधानसभा निवडणुकीत बदलले. हे कशामुळे झाले, आमचा पराभव का झाला, हे सर्वांना माहीत आहे, असे शिंदे यांनी सांगितले. आमच्या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी चांगले काम केले आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्हाला चांगले यश मिळेल, या भीतीने सत्ताधार्यांनी शासकीय यंत्रणांना हाताशी धरून प्रभाग रचना विशिष्ट पद्धतीने तयार केल्या आहेत, असा आरोप शिंदे यांनी केला.
ओबीसी हा आमचा डीएनए असल्याचे भाजप बोलत असला, तरी ओबीसींसाठी भाजपने कोणते निर्णय घेतले, हे जाहीर करावे. सत्तेत येताच मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आपण धनगर आरक्षण जाहीर करू, असे आश्वासन भाजपने दिले होते. याच भाजपने माळी आणि मराठामध्ये वाद निर्माण केला आहे. मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्रे दिली जातील, असे सांगणार्या भाजपने त्याचीही अंमलबजावणी केली नाही, अशी टीका शिंदे यांनी केली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती; पण ही समिती अचानक बदलून तिचे अध्यक्षपद आता राधाकृष्ण विखे-पाटील यांना दिले आहे. याचा अर्थ मागील समितीने काय काम केले, हे सरकारने जाहीर केले पाहिजे; पण सरकार काहीही करणार नाही. जाती-धर्मात झुंज लावून सत्ता मिळवण्याचे यांचे उद्दिष्ट आहे. आता मराठा आंदोलक मनोज जरांगे मुंबईत मोर्चा घेऊन आले आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या शहराची आणि तेही सणासुदीच्या दिवसांत कोंडी होऊ नये, यासाठी सरकारने मराठा आरक्षणाबाबत मार्ग काढला पाहिजे, असे शिंदे म्हणाले.
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत. सर्व पक्षांच्या नेत्यांनी एकत्र बसून जागावाटप केले जाईल. याबाबत स्थानिक पातळीवर हे निर्णय घेतले जातील. देश पातळीवरही सर्वच निवडणुका एकत्र लढल्या जातील; परंतु आमच्या भीतीने विरोधी पक्ष मोडून काढण्याचे काम सत्ताधारी करत आहेत, असा आरोपही शिंदे यांनी केला.
पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या अथक परिश्रमामुळे कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ झाले असल्याचे गौरवोद्गार शशिकांत शिंदे यांनी यावेळी काढले. या खंडपीठामुळे पश्चिम महाराष्ट्रातील प्रलंबित खटले मार्गी लागतील, पक्षकारांचा वेळ वाचेल, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.