मुलुंड: मुंबईच्या भांडुपमधील प्रसिद्ध 'मित्रांदा ढाबा'वर अन्न व औषध प्रशासनाने परवाना निलंबित करण्याची कडक कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेदरम्यान ही कारवाई करण्यात आली.
भांडुप पश्चिम येथे 'मित्रांदा ढाबा' हा प्रसिद्ध ढाबा मागील अनेक वर्षांपासून खवय्यांचे चोखले पुरवत होता. परंतु नुकताच या ढाब्यावर अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकून त्यांचा अन्न परवाना निलंबित करत कारवाई केली आहे. ही कारवाई करण्यामागची प्रमुख कारण म्हणजे या ढाब्यात आढळलेली अस्वच्छता.
स्वयंपाकघरात भटके कुत्रे आढळले
ढाब्याच्या स्वयंपाकघरात आणि मांस प्रक्रिया विभागाजवळ भटके कुत्रे आणि मांजरी फिरताना एफडीएच्या अधिकाऱ्यांना आढळून आले. कीटक नियंत्रणाच्या अभावामुळे येथे स्वयंपाकघर आणि अन्न साठवणुकीच्या ठिकाणी झुरळे, माश्या आणि इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून आला.
याचबरोबर आस्थापनाकडे व्यवसायासाठी आवश्यक असणारी वैध कागदपत्रे उपलब्ध नव्हती. ढाब्यावरील काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अनिवार्य वैद्यकीय आरोग्य तपासणी करण्यात आली नव्हती.
या गंभीर त्रुटींमुळे ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचे स्पष्ट झाल्याने एफडीएने तातडीने या हॉटेलचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित केला. एफडीएच्या धडक कारवाईमुळे अन्नात भेसळ करणाऱ्यांचे धाबे दणाणून गेले आहेत.