मुंबई : मिठी नदी घोटाळ्याच्या चौकशीसंदर्भात ईडीने मुंबईतील सुमारे आठ ठिकाणी छापेमारी केली. मिठी नदीतून काढलेल्या गाळाचे डंपिंग आणि विल्हेवाट लावण्याबाबत बृहन्मुंबई महापालिकेला बनावट सामंजस्य करार सादर केल्याचा आरोप असलेल्या कंत्राटदारांशी संबंधित असलेल्या जागांवर हे छापे टाकण्यात आले आहेत.
अनेक कंत्राटदारांनी बनावट सामंजस्य करार केले होते आणि कधीही न केलेल्या किंवा मोठ्या प्रमाणात वाढवून दाखवलेल्या गाळ काढण्याच्या कामासाठी देयके मागण्यासाठी दिशाभूल करणारी माहिती दिली होती. या कथित घोटाळ्यामुळे बीएमसीचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
ईडीच्या छापेमारीचा उद्देश आर्थिक पुरावे गोळा करणे आणि घोटाळ्याशी संबंधित पैशांचा माग काढणे हा आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार चालू असलेल्या कारवाईच्या निकालांच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, यापूर्वी १५ जुलै रोजी, मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने (ईओडब्ल्यू) शहरातून वाहणाऱ्या मिठी नदीच्या गाळ काढण्याशी संबंधित ६५ कोटी रुपयांच्या कथित फसवणुकीबद्दल कंत्राटदार आणि नागरी अधिकाऱ्यांसह १३ जणांविरुद्ध मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. तपासादरम्यान पोलिसांनी बॉलिवूड अभिनेता दिनो मोरिया आणि इतरांचीही चौकशी केली आहे.
दिनो मोरिया या घोटाळ्यात सहभागी असल्याचा आरोप आहे आणि या मनी लॉड्रिंग चौकशीच्या संदर्भात मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने आणि अंमलबजावणी संचालनालयाने त्याची चौकशी केली आहे.