Dino Morea And Mithi River Scam News Pudhari
मुंबई

Mithi River Desilting Scam: दिनो मोरियाचा मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याशी काय संबंध? 10 FAQ

What is Mithi river Desilting Scam: सिल्ट पुशर मशीन आणि मल्टीपर्पज एम्फिबियस पँटून मशीनबाबतच्या करारात हव्या तशा अटी आणि शर्ती समाविष्ट केल्याचा आरोप.

पुढारी वृत्तसेवा

Mumbai Mithi River Desilting Scam How Dino Morea is Connected

मुंबई : मिठी नदीतील गाळ उपसण्यात झालेल्या घोटाळ्याप्रकरणी अभिनेता दिनो मोरिया अडचणीत आला आहे. फॅशनची दुनिया गाजवणारा आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या दिनो मोरियाचा या घोटाळ्याशी काय संबंध असा प्रश्न तुम्हाला पडला आहे का?.. पोलिसांनी दिनो मोरिया आणि त्याच्या भावाची चौकशी केली त्यासाठी कारणीभूत ठरले ते त्यांचे घोटाळ्यातील कंत्राटदारांशी असलेले संबंध. दिनो मोरियाचा भाऊ सॅटिनो मोरिया आणि घोटाळ्यातील आरोपी केतन कदमची पत्नी हे दोघे एकाच कंपनीच्या संचालकपदावर असून त्यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाल्याच्या संशय आहे आणि याच कारणावरून दोघांची चौकशी सुरू आहे. आता हा मिठी नदी गाळ घोटाळा काय, आरोपी कोण आहेत हे जाणून घेऊया पुढारीच्या विश्लेषणातून...

1. मिठी नदी कुठे उगम पावते?

मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार, मिठी नदी पवई आणि विहार जलाशयाच्या प्रवाहातून उगम पावते. या नदीची लांबी एकूण 18 किलोमीटर असून माहीम खाडी येथे ही नदी अरबी समुद्रात जाऊन मिळते. मुंबईची नैसर्गिक निचरा वाहिनी म्हणून ही नदी ओळखली जाते. याचं कारण म्हणजे पावसाळ्यात मुंबईतील सर्वाधिक पाणी ही नदी वाहून नेते. 2005 मधील पुरानंतर या नदीचं महत्त्व अधोरेखित झाले.

2. मिठी नदीतून गाळ काढण्याचे काम कोणाच्या अंतर्गत येते?

मिठी नदीच्या 11. 84 किमी लांबीच्या गाळ काढण्याचे काम बीएमसीच्या अखत्यारित आहे तर नदीच्या उर्वरित 6.8 किमी लांबीच्या गाळ काढण्याचे काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) च्या अखत्यारित आहे.

3. मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याचा तपास कोण करत आहे?

2005 ते 2021 या कालावधीत मिठी नदीतून गाळ काढण्यावर झालेल्या सुमारे 1,100 कोटी रुपयांच्या खर्चाची चौकशी मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष तपासाकडून (SIT) सुरु आहे.

4. मिठी नदी गाळ उपसा प्रकरणात SIT ची स्थापना का करण्यात आली?

ऑगस्ट 2024 मध्ये भाजपचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत प्रश्न उपस्थित केले होते. यानंतर एसआयटीमार्फत चौकशी करण्याची घोषणा झाली होती. या एसआयटीत आर्थिक गुन्हे शाखेचे सहपोलिस आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस आयुक्त, पोलिस उपायुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्तांसह काही कनिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

5. मिठी नदी घोटाळ्या प्रकरणी किती जणांची चौकशी करण्यात आली?

एसआयटीने प्राथमिक चौकशीत डझनभरहून अधिक कंत्राटदारांची तासन् तास चौकशी केली.

6. मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी पहिला गुन्हा कधी दाखल करण्यात आला?

हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्यात पहिला एफआयआर मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने 6 मे 2025 रोजी दाखल केला. महापालिकेला ६५.५४ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेला फसवल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला.

7. मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यातील आरोपी कोण आहेत?

पहिल्या एफआयआरमध्ये पाच कंत्राटदार, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे तीन अधिकारी, तीन मध्यस्थ दलाल आणि दोन खासगी कंपनी अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. गुन्हा दाखल झाल्याच्या दिवशी एसआयटीने आठ ठिकाणी झाडाझडती घेतली होती.

8. मिठी नदीप्रकरणी आरोपी कोण आणि त्यांच्याविरुद्ध कोणत्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे?

आर्थिक गुन्हे शाखेतून मिळालेल्या माहितीनुसार, महापालिकेचे सहाय्यक अभियंता प्रशांत रामुगडे, उपमुख्य अभियंता गणेश बेंद्रे आणि तायशेटे आणि अॅक्युट डिझायनिंग, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एनए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन आणि जेआरएस इन्फ्रास्ट्रक्चरचे संचालक दीपक मोहन, किशोर मेनन, जय जोशी, केतन कदम आणि भूपेंद्र पुरोहित यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, १२०-ब अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

9. मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्यात नेमकी फसवणूक काय झाली?

सिल्ट पुशर मशीन आणि मल्टीपर्पज एम्फिबियस पँटून मशीनबाबतच्या करारात हव्या तशा अटी आणि शर्ती समाविष्ट करून, आरोपी मोहन, मॅटप्रॉप कंपनीचे मेनन, मेसर्स व्हर्जो स्पेशालिटीज प्रायव्हेट लिमिटेडचे जोशी आणि केतन कदम आणि वोडार इंडिया एलएलपीचे इतर भागीदार आणि संचालक आणि कंत्राटदार भूपेंद्र पुरोहित आणि इतरांनी महापालिकेची आर्थिक फसवणूक करण्याचा कट रचला.

अॅक्युट डिझाइन्स, कैलाश कन्स्ट्रक्शन कंपनी, एन ए कन्स्ट्रक्शन, निखिल कन्स्ट्रक्शन कंपनी, जे.आर.एस इन्फ्रास्ट्रक्चर आणि इतर कंत्राटदार कंपन्यांच्या संचालकांनी सादर केलेल्या खोट्या आणि बनावट सामंजस्य

करारात नमूद डंपिंग साइट्सची सत्यता पडताळून न पाहता, महापालिकेच्या पजवा विभागातील आरोपी अधिकाऱ्याने कंत्राटदारांचा फायदा करून दिला,  असे एफआयआरमध्ये म्हटले आहे.

महापालिकेच्या संबंधित विभागातील पालिका अधिकाऱ्यांनी वजन पूल आणि लॉग शीटशी संबंधित बनावट कागदपत्रांच्या आधारे बिले मंजूर केली आणि महापालिकेला लुटणाऱ्या कंत्राटदारांत ते सामील झाले.

10. दिनो मोरियाचा मिठी नदी गाळ उपसा घोटाळ्याशी काय संबंध?

पोलिस तपासात अद्याप तरी दिनो मोरियाचा घोटाळ्याशी थेट संबंध उघड झालेले नाही. मात्र, दिनो मोरियाचा   भाऊ सॅटिनो हा  UBO Ridez Private Limited या कंपनीच्या संचालकपदी आहे. या कंपनीचा पत्ता वरळीतील फॅमस स्टुडिओजवळ असा देण्यात आला आहे. याच कंपनीजवळ वोडार इंडिया LLP या कंपनीचेही कार्यालय आहे. (वोडार इंडिया एलएलपी ही कंपनी मिठी नदी घोटाळ्याशी संबंधित आहे)

घोटाळ्यातील आरोपी केतन कदम (वय 50) याची पत्नी पुनिता आणि दिनो मोरियाचा भाऊ सॅटिनो हे दोघे एकाच कंपनीत संचालकपदावर आहेत. याच ओळखीतून पुढे दिनो मोरियाने कदमची महापालिका अधिकाऱ्यांशी गाठ घालून दिली असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. सॅटिनो आणि पुनिता यांच्यात काही आर्थिक व्यवहारही झाल्याचे प्राथमिक चौकशीतून समोर आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT