मुंबई/खोपोली : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वरील खोपोली बायपास ते सिंहगड कॉलेज लोणावळा दरम्यानच्या मिसिंग लिंक मार्गाचे काम पूर्ण झाले असून, मुंबई-पुणे दरम्यानच्या प्रवासाची वेळ आता 30 मिनिटांनी कमी होणार आहे. वाहनचालकांकडून कोणताही अतिरिक्त टोल घेतला जाणार नाही. येत्या महाराष्ट्रदिनी, 1 मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन करून प्रवाशांंसाठी हा मार्ग खुला होणार आहे, अशी घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. मुंबई एक्स्प्रेस वेवरील मिसिंग लिंकच्या पूर्ण झालेल्या कामाची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी सखोल पाहणी केली.
विशेष योगायोग
- सुमारे 6 हजार 700 कोटी रुपयांच्या या प्रकल्पाला 2019 साली मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली. आता त्यांच्या उपस्थितीतच या प्रकल्पाचे लोकार्पण होणार असल्याने हा एक विशेष योगायोग आहे.
30 मिनिटांच्या विक्रमी वेळेची बचत
खोपोली बायपास ते सिंहगड कॉलेज लोणावळा दरम्यानच्या आठ कि.मी. अंतराच्या सह्याद्रीच्या पोटातून जाणार्या या मिसिंग लिंक मार्गामुळे मुंबई- पुणे एक्स्प्रेस वेचे 94.4 कि.मी.चे अंतर आता 13 कि.मी.ने कमी होऊन 81.4 कि.मी. झाले आहे. परिणामी, कळंबोली ते पुणे या प्रवासास पूर्वी लागणारा दोन तासांचा वेळ आता दीड तासावर येणार असल्याने 30 मिनिटांच्या वेळाची बचत होणार असल्याने एक्स्प्रेस वेवरील वाहतूक गतिमान होणार आहे.
तलावाच्या खालून बोगदा, दोन केबल स्टेड पूल
सुमारे 10.5 किलोमीटर लांबीच्या या प्रकल्पात अत्याधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात आलेले दोन भव्य बोगदे, उंच व्हायाडक्ट आणि टायगर व्हॅलीवरील सुमारे 182 मीटर उंच केबल स्टेड पूल उभारण्यात आला आहे. सुमारे 23.75 मीटर रुंद बोगदा हा जगातील सर्वात रुंद बोगद्यांपैकी एक मानला जातो. लोणावळा तलावाच्या 182 मीटर खालून हा रस्ता जाणार आहे.