मीरा रोड : मिरा-भाईंदर शहरात महिला आणि मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर एका 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला मद्य आणि भांगेच्या गोळ्या देऊन तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना मिरा रोड मध्ये उघडकीस आली आहे. या प्रकरणी मिरा रोड पोलिसांनी कारवाई करत दोन नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलगी 5 जानेवारीच्या रात्री आपल्या एका ओळखीच्या मित्राच्या विश्वासाला बळी पडली. 21 वर्षीय सलमान खान याने तिला आपल्या कारमध्ये बसवून कमी वर्दळीच्या ठिकाणी नेले.
यावेळी त्याचा 24 वर्षीय मित्र सरदारजी हा देखील कारमध्ये उपस्थित होता. आरोपींनी निर्लज्जपणाचा कळस गाठत आधी मुलीला बळजबरीने भांगेच्या गोळ्या खायला लावल्या. मात्र, मुलगी शुद्धीत असल्याचे पाहून त्यांनी तिला मद्य पाजले. मुलगी पूर्णपणे बेशुद्ध झाल्यानंतर दोन्ही नराधमांनी कारमध्येच तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला.
या अमानवी कृत्यानंतर पीडितेने हिंमत एकवटून सर्व प्रकार आपल्या कुटुंबाला सांगितला. मंगळवारी मिरा रोड पोलीस ठाण्यात याप्रकरणी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे बुधवारी दुपारी सलमान खान आणि त्याच्या साथीदाराला अटक केली आहे.
काही दिवसांपूर्वीच मिरा-भाईंदर महापालिका मुख्यालयात एका महिला कर्मचाऱ्यावर अत्याचाराची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच आता भररस्त्यात घडलेल्या या प्रकारामुळे शहरात भीतीचे आणि संतापाचे वातावरण आहे.