Gilbert Mendonca
मुंबई : मिरा-भाईंदर शहराचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा (वय ७२) यांचे सोमवारी निधन झाले. मुंबई येथील बॉम्बे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात एक मुलगा, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे.
मिरा-भाईंदर शहराचे पहिले नगराध्यक्ष आणि पहिले आमदार होण्याचा मान गिल्बर्ट मेंडोन्सा मिळाला होता. उत्तन येथील ईस्ट इंडियन समाजातून येणारे मेंडोन्सा यांचा मिरा-भाईंदरच्या राजकारणावर मोठा प्रभाव होता. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी सक्रिय राजकारणापासून अंतर घेतले होते.
त्यांच्या निधनानंतर अनेक राजकीय नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. मिरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी म्हटले की, "गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी सार्वजनिक जीवनात केलेली अथक मेहनत, सामाजिक कार्याप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि लोकांशी जपलेला वैयक्तिक संपर्क, हे सर्व मिरा-भाईंदरच्या राजकीय आणि सामाजिक इतिहासात स्मरणात राहील." "मिरा भाईंदरने एक कणखर व्यक्तिमत्व गमावले आहे," असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. "एक समर्पित नेता आणि दयाळू व्यक्तिमत्व, जनसेवेतील त्यांचे योगदान नेहमीच स्मरणात राहील," अशा भावना मिरा भाईंदरमधील काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी व्यक्त केल्या.