मच्छिंद्र आगिवले
वाडा : वाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत परळी गावातील एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनुसार या मुलीचे अवघ्या चौदाव्या वर्षी संगमनेर येथील एका तरुणांसोबत जबरदस्तीने लग्न लावून देण्यात आले होते. शहापूर तालुक्यातील किन्हवली भागात असाच प्रकार उजेडात आला असून पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्यात पन्नास हजारांसाठी अल्पवयीन मुलीची पारनेर तालुक्यातील एका तरुणाशी लग्नगाठ बांधली जाणार होती.
लग्नासाठी अल्पवयीन मुलींची केली जाणारी विक्री ही महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना असून मुख्यमंत्र्यांनी याबाबत चौकशीचे आदेश द्यावेत अशी मागणी विवेक पंडित यांनी केली आहे. परळी गावातील कातकरी समाजातील एका 14 वर्षीय तरुणीचा संगमनेर येथील अन्य जातीतील मुलासोबत जबरदस्तीने विवाह करून देण्यात आला. गावातील एका दलालामार्फत हा विवाह जुळवून देण्यात आला असून आई-वडिलांनी विरोध केल्यावर त्यांना बदनामीची भीती दाखवून गळचेपी करण्यात आली. गर्भवती मुलीची नोंदणी दवाखान्यात करण्यासाठी वय वाढवून बनावट आधारकार्ड देखील बनविण्यात आले मात्र मुलीला जन्म दिल्याने सगळी गणितं बिघडून गेली. चारित्र्यावर संशय घेऊन सतत होणारी मारहाण व उपासमार यामुळे कंटाळून अखेर मुलगी आपल्या गावी आली व सामाजिक कार्यकर्त्यांच्या हस्तक्षेपाने हा प्रकार चव्हाट्यावर आला.
वाडा पोलीस ठाण्यात मुलीच्या फिर्यादीवरून आतापर्यंत सहा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किन्हवली पोलीस ठाण्यात प्रकाश मुकणे या दलालाच्या मदतीने एका अल्पवयीन मुलीचा बाबुलवाडे (पारनेर), जिल्हा, अहिल्यानगर येथील जय शिर्के नावाच्या व्यक्तीसोबत 5 ऑक्टोबर विवाह ठरविला होता. बदल्यात 50 हजार पीडित मुलीच्या कुटुंबाला देण्यात येणार असून यातील 10 हजारांची रक्कम देण्यात आली आहे. नाशिक, नगर व अन्य जिल्ह्यांमध्ये मुलींची होणारी विक्री हा गंभीर प्रकार समोर येत आहे. वाड्यातील बुधावली येथे 4 तर शिलोत्तर व जव्हार तालुक्यात प्रत्येकी 1 अशा विविध गावांमध्ये अशाच घटना घडल्याचा संशय असल्याचे सामाजिक कार्यकर्ते विजय जाधव यांनी सांगितले.