कोपरखैरणे : तळोजा परिसरातील एका गावात राहणाऱ्या दहावी इयत्तेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने सतत होणाऱ्या मानसिक छळाला कंटाळून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना 12 नोव्हेंबर रोजी घडली. घरात कोणी नसताना तिने जीवन संपवण्याचा मार्ग निवडला. या घटनेनंतर तब्बल 16 दिवसांनी तिला वारंवार त्रास देणाऱ्या 19 वर्षीय युवकाविरोधात तळोजा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यातील कलम 12 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण भगत या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
पीडित पालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ऑगस्ट ते नोव्हेंबर या कालावधीत संबंधित तरुण त्या मुलीचा शाळेतून घरी जाताना पाठलाग करत होता. तसेच शाळेच्या बाहेर तिला मारहाणीबरोबर शिवीगाळही केली होती. त्याने वारंवार बाहेर फिरायला येण्याचा दबाव टाकला, तसेच मुलीने त्याच्यावर प्रेम करावे असा आग्रह धरत धमक्या दिल्या. या सततच्या त्रासामुळे मुलगी मानसिकरीत्या खचली होती, असे पालकांनी सांगितले.
या तरुणाने मुलीला लिहिलेल्या चिठ्ठीमुळे स्वतः हा युवक बारावीचा विद्यार्थी असल्याचे पालकांना समजले. ही चिठ्ठी मृत्यूनंतर पालकांच्या हाती लागली. मुलीच्या पालकांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करून सतत होत असलेल्या त्रासामुळे मुलीने आत्महत्या केल्याचे स्पष्ट केले आहे.