मंत्र्यांच्या गैरवर्तनाने सरकारची डोकेदुखी वाढली pudhari photo
मुंबई

Political News : मंत्र्यांच्या गैरवर्तनाने सरकारची डोकेदुखी वाढली

संजय शिरसाट, भरत गोगावलेंनंतर माणिकराव कोकाटे विरोधकांचे लक्ष्य

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : आपल्या मंत्र्यांच्या आणि नेत्यांच्या गैरवर्तनाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची डोकेदुखी वाढली असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षापुढील अडचणी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यामुळे वाढल्या आहेत. कोकाटे हे सभागृहात मोबाईलवर रमी खेळत असल्याचे समोर आल्याने विरोधकांना आयते कोलित मिळाले असून, कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढला आहे.

कोकाटे हे सभागृह सुरू असताना मोबाईलवर रमी खेळत असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. आधीच शेतकर्‍यांविषयी केलेल्या वक्तव्याने टीकेचे धनी झालेल्या कोकाटे यांना घेरण्याची आयती संधी विरोधकांना मिळाली आहे. विरोधकांबरोबरच शेतकरी संघटना आणि अन्य संघटनाही त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आक्रमक झाल्या आहेत. त्यातच लातूर येथे कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर पत्ते फेकणार्‍या छावा संघटनेच्या पदाधिकार्‍यांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि अन्य पदाधिकार्‍यांनी बेदम मारहाण केल्याने आगीत तेल ओतले गेले आहे. अजित पवारांनी सूरज चव्हाण यांचा राजीनामा घेतला असला, तरी कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.

सुनील तटकरे यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पाहता, राज्यव्यापी दौरा आखला आहे. मात्र, कोकाटे प्रकरणाने या दौर्‍याच्या सुरुवातीलाच गालबोट लागले आहे. दुसर्‍या दिवशी धाराशिव येथील दौर्‍यावेळीही लातूरच्या घटनेचे पडसाद उमटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याचा सहभाग उघड झाल्यावर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुंडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय होते. आता दुसरे निकटवर्तीय मंत्री असलेले कोकाटे वादाच्या भोवर्‍यात सापडले आहेत. नाशिक जिल्ह्यातून सुरुवातीला छगन भुजबळ यांचा पत्ता कापून अजित पवारांनी कोकाटे यांना संधी दिली. मात्र, आता त्यांच्या वर्तनाने राष्ट्रवादीची पुरती कोंडी झाली आहे.

शिवसेना नेते आणि सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट हे त्यांच्या बेहिशेबी मालमत्ता आणि नोटांच्या बॅगेसह समोर आलेल्या व्हिडीओने अडचणीत आले आहेत. फलोत्पादनमंत्री भरत गोगावले हे त्यांच्या अघोरी पूजा आणि खासदार नारायण राणे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याने वादात सापडले होते.

  • शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी टॉवेल, बनियन अशा वेशात आकाशवाणी आमदार निवासातील कॅन्टीनमधील कर्मचार्‍याला मारहाण केल्याने शिवसेनेला टीका सहन करावी लागली होती. आता अजित पवारांनाही मंत्री आणि नेत्यांच्या गैरवर्तनामुळे डोकेदुखी सहन करावी लागत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT