Cabinet Meeting
मुंबई : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी सरकारने जाहीर केलेली मदत त्यांच्यापर्यंत खरोखरच पोहोचली आहे की नाही? यावरून आज कॅबिनेट बैठकीत मोठा राडा झाला. उद्धव ठाकरे मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या घरी जाऊन सरकारच्या मदतीच्या दाव्यांचा 'फॅक्ट चेक' करणार असतानाच, आज मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनीच 'मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नाही' असा थेट आरोप प्रशासनावर केला आहे. कॅबिनेटमध्ये मंत्री आणि प्रशासनामध्ये झालेल्या या खडाजंगीत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली.
आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देवेंद्र फडणवीस राज्यात अतिवृष्टी आणि महापूर आला त्यासंदर्भातल्या पॅकेजचा आढावा घेतल्याचे सांगितले. आतापर्यंत ८ हजार कोटी रिलीज झाले आहेत. ४० हजार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचले असून ११ हजार कोटींना आज मान्यता दिली असल्याचे सांगितले. मात्र, बैठकीदरम्यान सरकारने दिलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहचली नसल्याचा दावा मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी केला. यावेळी प्रशासनाने आमच्या कडून शेतकऱ्यांपर्यंत मदत पोहचली असल्याचे सांगितले. यावरून मंत्री आणि प्रशासन यांच्यात खडाजंगी झाली.
सरकारकडून देण्यात आलेली मदत तुम्ही पोहचली म्हणता, जिल्हाधिकारी देखील मदत दिली म्हणतात, पण प्रत्यक्षात शेतकरी मदत मिळाली नसल्याचे सांगत असल्याचे पाटील यांनी कॅबिनेट बैठकीत सांगितले. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्ती करत आता पर्यंत झालेल्या मदतीसंदर्भात आजच आढावा बैठक घ्या आणि किती मदत पोहचली यासंदर्भात माहिती द्या, असे आदेश दिले आहेत.