मुंबई : कोणगाव पनवेल येथील घरे नाकारणार्या 1 हजार 309 गिरणी कामगारांची यादी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाने (म्हाडा) जाहीर केली आहे. या कामगारांना घरे घेण्यासाठी पुन्हा एकदा संधी दिली जाणार आहे.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) पनवेल कोणगाव येथे गिरणी कामगारांसाठी घरे बांधली आहेत. या 2 हजार 417 घरांसाठी म्हाडाने 2016 साली सोडत काढली होती. हे ठिकाण मुंबईबाहेर असल्याने ही घरे घेण्यास सुरुवातीला गिरणी कामगारांनी विरोध दर्शवला होता. काही कामगारांनी संमती दिली. त्यानंतर 2020 साली करोनामुळे या घरांची ताबा प्रक्रिया रखडली. दरम्यानच्या काळात घरांची दुरुस्तीदेखील करण्यात आली.
उर्वरित घरांचा ताबा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. गिरणी कामगार वारस संघर्ष सेवा समितीचा मुंबईबाहेरील घरांना विरोध आहे. गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना मुंबईत गिरण्यांच्या जागेवरच घरे देण्याची संघटनेची मागणी आहे. त्यामुळे 1 हजार 309 गिरणी कामगारांनी कोणगाव येथील घरे नाकारली होती. ही घरे तशीच पडून असल्याने ती घ्यावीत, अशी विनंती म्हाडा गिरणी कामगारांना करत आहे.
घरे नाकारलेल्या गिरणी कामगारांची यादी म्हाडाने जाहीर केली आहे. त्यांना पुन्हा एकदा घरे घेण्यासाठी संधी देण्यात आली आहे. त्यानंतरही या घरांना प्रतिसाद न मिळाल्यास प्रतीक्षा यादीतील गिरणी कामगारांना संधी दिली जाणार आहे.