मुंबई

मार्चपासून मुंबईत दूध दरवाढ; सुट्टे दूध ९५ रुपये लिटरने घ्यावे लागणार विकत

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : गवत, पेंडसह जनावरांच्या इतर खाद्याच्या दरात १५ ते २५ टक्के वाढ झाल्यामुळे मुंबईकरांना मार्चपासून सुट्टे दूध ९५ रुपये प्रतिलिटर दराने घ्यावे लागणार आहे. सध्या या दुधाचा भाव ९० रुपये प्रतिलिटर आहे. दरम्यान, अलीकडेच अमूल, गोकुळ आणि वारणा या दूध कंपन्यांनी लिटरमागे तीन रुपयांची वाढ केली होती. त्यात आता सुट्टे दूधही महागणार असल्यामुळे मुंबईकरांच्या खिशाला आणखी झळ पोहोचणार आहे.

दुग्धजन्य जनावरांच्या खाद्याचे दर वाढल्यामुळे दुधाचे दर वाढवण्याच्या पार्श्वभूमीवर जोगेश्वरी येथील सौराष्ट्र पटेल समाज सभागृहात मुंबई दूध उत्पादक संघाचे पदाधिकारी वली पीर, कासम काश्मीर आणि चंद्रकुमार सिंह यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतीच बैठक झाली. संघाच्या सदस्यांनी दरवाढ का आवश्यक आहे, याची विविध कारणे सांगितली. खाद्यांच्या दरवाढीसोबतच कर्मचाऱ्यांचे वेतन, भत्ते आणि इंधन दरवाढ ही त्यामागची प्रमुख कारणे असल्याचे यावेळी सांगण्यात आले. यामुळे सर्वानुमते घाऊक दरात ८० रुपयांवरून ८५ रुपये प्रतिलिटर दरवाढ करण्याचे निश्चित झाले.

घाऊक दरात वाढ केल्यामुळे किरकोळ विक्रीदरातही वाढ होणार आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना ९५ रुपये प्रतिलिटरने दूध खरेदी करावे लागणार आहे. ही दरवाढ ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत असेल, असे चंद्रकुमार सिंह यांनी स्पष्ट केले.

SCROLL FOR NEXT