Maharashtra CET  pudhari photo
मुंबई

MHT CET Result 2026: आता सीईटी निकालावरून वादंग; बारावीत कमी गुण, मात्र पर्सेंटाइल ९९ ते १०० वर

परीक्षा प्रक्रिया पारदर्शक : सीईटी सेल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या एमएचटी-सीईटी २०२६ परीक्षेच्या निकालावरून मोठा वाद निर्माण झाला आहे. बारावी, जेईई मेन आणि एमएचटी-सीईटीच्या निकालांतील विसंगती, सोशल मीडियावर व्हायरल झालेले व्हिडीओ आणि कथित ऑडिओ क्लिपच्या आधारे विरोधक आणि काही शिक्षकांनी परीक्षा प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करत स्वतंत्र फॉरेन्सिक चौकशीची मागणी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार, काँग्रेस नेते सचिन सावंत आणि प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सीईटी निकाल जाहीर झाल्यानंतर काही शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकांचे विश्लेषण करून बारावी, जेईई मेन आणि एमएचटी-सीईटीच्या निकालांची तुलना करणारे व्हिडीओ प्रसिद्ध केले. या व्हिडीओंमध्ये बारावीत पीसीएम गटात तुलनेने कमी गुण मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटीमध्ये ९९ ते १०० पर्सेंटाइल मिळाल्याची उदाहरणे देण्यात आली.

काही विद्यार्थ्यांना जेईई मेनमध्ये कमी पर्सेंटाइल मिळाले, मात्र एमएचटी-सीईटीमध्ये अत्यंत उच्च पर्सेंटाइल मिळाल्याचा दावा करत सुमारे १३६ विद्यार्थ्यांच्या निकालांबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आले. या विसंगतींची स्वतंत्र तांत्रिक आणि फॉरेन्सिक चौकशी व्हावी, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका कथित क्लिपने या वादाला आणखी हवा मिळाली. या क्लिपमध्ये काही विशिष्ट परीक्षा केंद्रांमध्ये विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी पाठविणे, आर्थिक व्यवहारांच्या माध्यमातून मदत मिळू शकते, तसेच संगणकाधारित परीक्षेदरम्यान बाह्य हस्तक्षेप होऊ शकतो, अशा स्वरूपाचे दावे करण्यात आले आहेत.

या क्लिपच्या आधारे काही शिक्षकांनी संबंधित परीक्षा केंद्रांमधील सीसीटीव्ही फुटेज, सर्व्हर लॉग, संगणकीय नोंदी आणि डिजिटल पुराव्यांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची मागणी केली आहे. तथापि, या कथित ऑडिओ क्लिपची सत्यता अद्याप कोणत्याही अधिकृत यंत्रणेने प्रमाणित केलेली नाही.

या पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या शिष्टमंडळाने मंगळवारी सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.

निकाल प्रक्रियेबाबत विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झालेल्या शंका, काही परीक्षा केंद्रांबाबत होत असलेले आरोप आणि सोशल मीडियावरील दाव्यांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. सर्व्हर लॉग, उत्तरपत्रिकांची पडताळणी, डिजिटल नोंदी, संगणकीय माहिती आणि परीक्षा प्रक्रियेचे स्वतंत्र परीक्षण करून सत्य समोर आणावे, अशी मागणी शिष्टमंडळाने केली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड होऊ देणार नाही. चौकशी झाली नाही आणि गुणवंत विद्यार्थ्यांना न्याय मिळाला नाही, तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असा इशारा दिला.

काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याची मागणी केली, तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी नीट, टीईटी आणि एमपीएससी परीक्षांतील वादांचा उल्लेख करत राज्यातील परीक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केले. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित प्रत्येक आरोपाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

सीईटी सेलचे स्पष्टीकरण

वाद वाढत असताना सीईटी सेलचे आयुक्त दिलीप सरदेसाई यांनी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले. त्यांनी स्पष्ट केले की, बारावीची परीक्षा आणि एमएचटी-सीईटी या पूर्णपणे वेगळ्या स्वरूपाच्या परीक्षा आहेत. बारावीत मिळालेले टक्के आणि एमएचटी-सीईटीमधील पर्सेंटाइल यांची थेट तुलना करणे वैज्ञानिकदृष्ट्या चुकीचे आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, एमएचटी-सीईटी ही संगणकाधारित परीक्षा असून ती अनेक दिवस आणि विविध शिफ्टमध्ये घेतली जाते. प्रत्येक शिफ्टमधील प्रश्नपत्रिकेची कठीणता वेगवेगळी असू शकते. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी वैज्ञानिक 'नॉर्मलायझेशन' प्रक्रियेनंतर पर्सेंटाइल निश्चित केले जाते.

पर्सेंटाइल म्हणजे मिळालेल्या टक्के गुणांचे प्रमाण नसून, त्या विद्यार्थ्याची इतर विद्यार्थ्यांच्या तुलनेतील गुणवत्ता दर्शविणारा निर्देशांक आहे. त्यामुळे १०० पर्सेंटाइल म्हणजे १०० टक्के गुण असा अर्थ होत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

बारावीतील टॉपर्सनाही कमी पर्सेंटाईल : सरदेसाई

१०० पर्सेंटाइल मिळवलेल्या ३८ विद्यार्थ्यांपैकी ३६ विद्यार्थी गुणवत्ता यादीत असून उर्वरित दोघांनी केंद्रीय प्रवेश प्रक्रियेसाठी अर्जच केलेला नव्हता, असेही त्यांनी स्पष्ट केले. याउलट, बारावीत पीसीएम गटात ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या ३४४ विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये ४० पर्सेंटाइलपेक्षा कमी, तर ८० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवलेल्या ४,६१० विद्यार्थ्यांना ५० पर्सेंटाइलपेक्षा कमी गुण मिळाल्याची आकडेवारीही त्यांनी मांडली. त्यामुळे एका परीक्षेतील कामगिरीवरून दुसऱ्या परीक्षेचा निकाल ठरतो, असा निष्कर्ष काढता येत नाही, असे सरदेसाई यांनी स्पष्ट केले.

सरदेसाई यांनी आकडेवारी सादर करत सांगितले की, बारावीत ४० ते ६० टक्के गुण मिळवून ९९ किंवा त्यापेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ ६३ आहे. उलट ९९ पेक्षा जास्त पर्सेंटाइल मिळवलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक विद्यार्थी बारावीत ७५ ते ८५ टक्के गुण मिळवलेल्या गटातील आहेत.

त्यामुळे काही आधारे संपूर्ण निकालावर संशय घेणे योग्य नाही.सर्व आरोप ठामपणे फेटाळत परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक असल्याचा दावा केला असून, समाजमाध्यमांवर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित करणाऱ्यांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाणे आणि महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT