मुंबई : पुढारी वृत्तसेवा
राज्य सीईटी कक्षातर्फे अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या एमएचटी-सीईटी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व गणित) परीक्षेची सुरुवात आजपासून होणार आहे. १९ ते २७ एप्रिल या कालावधीत होणाऱ्या या परीक्षेसाठी देशभरातून ४ लाख ६४ हजार २६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ३० हजार ८९५ विद्यार्थी हे राज्याबाहेरील आहेत. त्यातही ५ हजार ८८३ विद्यार्थी नवी दिल्लीतील असून पटणा शहरातून ४ हजार ९९६ विद्यार्थी अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी आवश्यक असलेली एमएचटी-सीईटी परीक्षा देणार आहेत.
अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी या अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीपैकी पहिल्या टप्प्यात औषधनिर्माणशास्त्र आणि कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येत असलेल्या भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) गटाची परीक्षा सुरळीत पार पडली. या परीक्षेला ३ लाख १ हजार ७२ विद्याथ्यर्थ्यांपैकी विविध सत्रांत २ लाख ८२ हजार ७३७ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली, तर १८ हजार ३३५ विद्यार्थी परीक्षेला गैरहजर राहिले. दरम्यान, पीसीएम गटाची सीईटी आजपासून सुरू होत आहे.
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटीच्या पहिल्या टप्प्यात कृषी आणि औषधनिर्माण शास्त्र या अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असलेली भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र व जीवशास्त्र (पीसीबी) गटाची परीक्षा ९ ते १७ एप्रिलदरम्यान पार पडली. या परीक्षेसाठी राज्यासह देशभरातील ३ लाख १ हजार ७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. १६८ केंद्रांवर दोन सत्रांमध्ये घेण्यात आलेल्या या परीक्षेला ३ लाख १ हजार ७२ विद्याथ्यर्थ्यांपैकी २ लाख ८२ हजार ७३७ विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली. हे प्रमाण एकूण विद्यार्थ्यांच्या ९३.९१ टक्के इतके होते. परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये १ लाख ६५ हजार ४८२ मुली, १ लाख १७ हजार २४६ मुले तसेच ९ जण तृतीयपंथीय होते. एमएचटी सीईटीची परीक्षा दोन टप्प्यांत घेण्यात येते. यातील पहिल्या टप्प्यात पीसीबी गटाची परीक्षा यशस्वीरित्या पार पडली.
पीसीबी गटासाठी नोंदणी केलेल्या ३ लाख १ हजार ७२ विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दररोज सरासरी २३ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात येत होती. या परीक्षेला दररोज सरासरी १५०० विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पीसीबी गटासाठी नोंद केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाण अधिक होते. यामध्ये १ लाख ७५ हजार ३११ मुलींनी नोंदणी केली होती. तर १ लाख २५ हजार ७५० मुलांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्याथ्यापैकी १८ हजार ३३५ विद्यार्थी अनुपस्थित राहिले होते. यामध्ये ९ हजार ८२९ मुली, तर ८ हजार ५०४ मुले गैरहजर राहिले. तसेच दोन तृतीयपंथीय विद्यार्थी अनुपस्थित होते.