मुंबई: अभियांत्रिकी अभ्यासक्रमासाठी महत्त्वाची असलेल्या पीसीएम समूहाच्या पहिल्या संधीच्या सीईटीत २६ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटार्सल गुण मिळाले आहेत. यामध्ये २२ विद्यार्थी तर ४ विद्यार्थिनी आहेत. १०० पर्सेंटाईल गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांमध्ये २४ विद्यार्थी राज्यातील तर दोन विद्यार्थी इतर राज्यातील आहेत.
पीसीएम समूहाच्या पहिल्या संधीची सीईटी ११ ते २० एप्रिल या कालावधीत आठ दिवसांमध्ये १६ सत्रात घेण्यात आली. या सीईटी परीक्षेला एकूण ४ लाख ७९ हजार ३३२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. या सीईटी परीक्षेत १६ सत्रांत मिळून ४ लाख ५४ हजार ०६९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
यामध्ये २ लाख ७३ हजार १३५ विद्यार्थी होते व १ लाख ८० हजार ९१६ विद्यार्थिनी होत्या तर १८ तृतीयपंथीय होते. याला ९४.७३ टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती होती. ही सीईटी परीक्षा राज्यातील ४ लाख ४२ हजार २६१ तर राज्याबाहेरील ११ हजार ८०८ विद्यार्थ्यांनी दिली होती.
पीसीएम समूहाच्या पहिल्या संधीच्या या सीईटीमध्ये एकूण २६ विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळवले आहेत. राज्यातील २४ विद्यार्थ्यामध्ये आर्यन कुंजीर (पुणे), आदर्श राज (मुंबई उपनगर) ,आर्यन शर्मा (नागपूर), चैतन्य येरणे (चंद्रपूर), आशुतोषकुमार चौबे (मुंबई ), दर्शन चौधरी (चंद्रपूर), दर्शील कुंटे (ठाणे), ईश्वरी गागरे (अहिल्यानगर), इबादूर रहमान कामरुल बारलस्कर (पुणे), अनंत जाधव (धाराशिव), जान्हवी अस्ती (गोंदिया), जान्हवी मिश्रा (चंद्रपूर), कनिष्क वाघ (नागपूर), खानापुरे सार्थक (सोलापूर).
ध्रुव खोसे (लातूर), ऐश्वर्य लाडे (नागपूर), नमिष कौशिक (पुणे), नमया अग्रवाल (गोंदिया), राजदीप ठाकरे (यवतमाळ), रेयान कुमार (मुंबई), ऋतुराज राजे (गोंदिया), शौर्य फुलबांधे (नागपूर), शौर्य सिंग (ठाणे), वेद तळेले (ठाणे) या राज्यातील विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत. यामध्ये चार विद्यार्थींनी आहेत.
यामध्ये राज्याबाहेरील मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर येथील अगस्त्य पचौरी व पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथील आर्यमन डोकानिया या दोन विद्यार्थ्यांनी १०० पर्सेंटाईल गुण मिळविले आहेत.
यंदापासून प्रथमच दोन वेळा परीक्षा घेण्यात आल्याने विद्यार्थ्यांचे लक्ष आता दुसऱ्या संधीच्या निकालाकडे लागले असून, दोन्ही परीक्षांमधील सर्वोच्च पर्सेंटाइलच प्रवेशासाठी ग्राह्य धरण्यात येणार आहे.
दुसऱ्या संधीच्या सीईटीचे निकाल अद्याप जाहीर व्हायचे आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता क्रमवारीत बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः पहिल्या प्रयत्नात अपेक्षित कामगिरी न करणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या परीक्षेतील गुणांचा मोठा फायदा होऊ शकतो. हा निकाल सर्व विद्यार्थ्याच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आला असून, या अभ्यासक्रमाची सामाईक प्रवेश प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.