MHADA's relief to Virar's upset lottery winners
मुंबई : नमिता धुरी
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) विरार-बोळींज येथील प्रकल्पाच्या सोडत विजेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी आता एक नवा प्रस्ताव तयार केला जात आहे. सोडतीतील घरांची किंमत व सध्या प्रथम प्राधान्य योजनेतून विक्री होणाऱ्या घरांची किंमत यांतील फरकाची रक्कम ग्राहकांना परत करणे शक्य नसले तरी त्याऐवजी देखभाल शुल्कात (मेन्टेनन्स) सवलत देण्याचा प्रस्ताव म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे तयार केला जात आहे.
म्हाडाच्या कोकण मंडळातर्फे विरार-बोळींज येथे साधारण १० हजार घरांचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. यापूर्वी दोन ते तीन वेळा या घरांची सोडत काढण्यात आली; मात्र ग्राहकांचा फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. येथे पाणीपुरवठ्याची सोय नसल्याने ६ हजार घरे विक्रीविना पडून होती. गेल्या वर्षी डिसेंबरपासून म्हाडाने या घरांसाठी व्यापक जाहिरात मोहीम सुरू केली. तसेच घरांच्या विक्रीसाठी 'न्यू सातारा बँक' या संस्थेची नेमणूक करण्यात आली.
सध्या ही घरे 'प्रथम येणाऱ्यास प्राधान्य' या योजनेतून विकली जात आहेत. न्यू सातारा बँकेने एकगठ्ठा १०० घरांची विक्री केल्यास ग्राहकांना १२ टक्के सवलत दिली जात आहे. तसेच ग्राहकांना इमारत, मजला व सदनिका आपल्या पसंतीने निवडता येत आहे. सवलतीत घर खरेदी करणाऱ्या ग्राहकांपेक्षा सोडतीत घर घेतलेल्या ग्राहकांनी याच प्रकल्पातील घरांसाठी अधिक पैसे मोजले आहेत. त्यामुळे अन्याय झाल्याची भावना त्यांच्यामध्ये आहे. घरांच्या किमतीतील फरकाची रक्कम परत करावी, अशी मागणी सोडत विजेत्या ग्राहकांनी म्हाडाकडे केली आहे.
विक्री झालेल्या घरांचे पैसे परत करता येत नाहीत. त्यामुळे आता घरांच्या किमतीतील फरकाची रक्कम देखभाल शुल्कातून कमी करण्याचा प्रस्ताव तयार केला जात आहे. हा प्रस्ताव राज्य शासनाला पाठवला जाईल. प्रस्तावाला मान्यता मिळाल्यास सोडत्त विजेत्यांना दिलासा मिळणार आहे.
कृष्णा देवाडिगा, उपाध्यक्ष, म्हाडा संकुल समितीआम्ही २०१६ व २०१८ च्या सोडतीतील २ हजार ९५० सदनिकाधारक आहोत. सोडतीत घर घेताना आम्हाला पसंतीचे घर निवडता येत नव्हते. आम्हाला अधिवास प्रमाणपत्र जमा करणे अनिवार्य होते. फरकाची रक्कम म्हाडाने आम्हाला परत करावी. यासाठी आम्ही मुख्यमंत्र्यांनाही पत्र लिहिले आहे.
रेवती गायकर, मुख्य अधिकारी, कोकण मंडळ, म्हाडाअशाप्रकारे परत करता येत नाहीत. त्यामुळे आता घरांच्या किमतीतील फरकाची रक्कम देखभाल शुल्कातून कमी करण्याबाबतचा प्रस्ताव आम्ही तयार करत आहोत. -
घराचे क्षेत्रफळ
३३० चौरस फूट
४४० चौरस फूट
६७५ चौरस फूट
सोडत किंमत
२३२८५६६
२८७८०००
४१८१८३४
सवलत किंमत
२०४९१३८
२५३२६४०
३६८००१४
फरक
२७९४२८
३४५३६०
५०१८२०