नमिता धुरी
मुंबई: एका बाजूला अत्यल्प उत्पन्न गटाकडे म्हाडाचे दुर्लक्ष होत असताना दुसऱ्या बाजूला महाहाऊसिंग कॉर्पोरेशन मात्र याच ग्राहकवर्गासाठी बोरिवलीत 4 ते साडेचार हजार घरांचा मोठा गृहनिर्माण प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पात पीएमएवाय 2 अंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटाला 450 चौरस फुटांची घरे उपलब्ध होणार आहेत.
वार्षिक कमाल 6 लाखांपर्यंत उत्पन्न असणारे नागरिक अत्यल्प उत्पन्न गटात येतात. या गटातील ज्या नागरिकांचे स्वत:चे घर नाही अशांना प्रधानमंत्री आवास योजनेचा (पीएमएवाय) लाभ घेता येतो.
या योजनेच्या पहिल्या टप्प्यात अत्यल्प उत्पन्न गटाला 30 चौ. मीटरची घरे कमी दरात उपलब्ध होत होती. या योजनेंतर्गत म्हाडाने 30 चौरस मीटरची साधारण 2 हजार घरे गोरेगाव येथे बांधली. दोन वर्षांपूर्वी त्यांची सोडतही काढण्यात आली. मात्र त्यानंतर मुंबईत शासकीय प्राधिकरणाकडून पीएमएवाय प्रकल्पांची निर्मिती झाली नाही.
पीएमएवाय 2 या योजनेमुळे अत्यल्प उत्पन्न गटाला मुंबईत घर घेण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. बोरिवलीतील बीएसएनएलची 41 एकर व एमटीएनएलची 25 एकर अशी एकूण 66 एकर जागा महा हाऊसिंग कॉर्पोरेशन खरेदी करणार आहे.
यासाठी फेब्रुवारीत 125 कोटी रुपये अनामत रक्कम भरण्यात आली आहे. या जागेवर 4 ते साडे चार हजार घरे बांधली जातील. आतापर्यंतचा हा पीएमएवायचा सर्वात मोठा प्रकल्प असेल.पीएमएवाय 2 मध्ये घराच्या क्षेत्रफळात वाढ करण्यात आली असून 30 ते 45 चौरस मीटरची म्हणजेच 322 ते 484 चौरस फुटांची घरे बांधण्याची तरतूद आहे.
त्यामुळे बोरिवलीतील प्रकल्पात किमान 450 चौरस फूट किंवा कदाचित त्यापेक्षाही मोठी घरे उपलब्ध होतील. प्रकल्पातील निम्मी घरे 300 चौरस फुटांची असतील. त्यामुळे पीएमएवाय लाभार्थ्यांना त्यांच्या ऐपतीनुसार घर खरेदी करता येईल.
रेडीरेकनरनुसार किंमत
आतापर्यंत पीएमएवाय योजनेत बांधल्या जाणाऱ्या घरांची किंमत रेडीरेकनर दरांपेक्षा अधिक असे. मात्र यापुढे पीएमएवाय 2 अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या घरांची किंमत रेडीरेकनरइतकीच असेल. परिणामी, अत्यल्प उत्पन्न गटाचे हीत जपले जाईल. घरांच्या किंमती त्यांच्या आवाक्यात येतील.
सर्वसामान्यांना दिलासा
सर्वसामान्य नागरिकांना अत्यल्प दरात घरे उपलब्ध करून देण्यासाठी म्हाडाची निर्मिती झाली होती; मात्र गेल्या काही वर्षांत म्हाडाने आपल्या मूळ उद्देशालाच फाटा दिला आहे. 2023 साली पीएमएवाय योजनेत बांधलेली घरे वगळता म्हाडाने अत्यल्प गटासाठी गेल्या काही वर्षांत नवी घरे बांधली नाहीत.
उपलब्ध होणाऱ्या भूखंडांवर केवळ मोठी घरे बांधली जातात. त्यामुळे ही घरे अल्प उत्पन्न गटात दर्शवली जातात व त्यांच्या किंमती प्रचंड असतात. यामुळे बोरिवलीतील पीएमएवायचा प्रकल्प सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरेल.