नमिता धुरी
मुंबई : म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीत अर्ज करून थकलेल्या अर्जदारांना घर घेण्याची आणखी एक संधी मिळणार आहे. गेल्या काही सोडतींमध्ये रिक्त राहिलेल्या घरांची प्रथम येणाऱ्यास प्राधान्य तत्त्वावर विक्री केली जाणार आहे.
गेल्या काही वर्षांत म्हाडाच्या घरांच्या किमती प्रचंड वाढल्याने मुंबईतील अनेक घरे विक्रीविना शिल्लक राहिली आहेत. दोनवेळा सोडत काढूनही विक्री न झालेल्या घरांची प्रथम येणाऱ्यास प्राधान्य योजनेंतर्गत विक्री केली जाणार आहे. यासाठी म्हाडाने काही अटी शिथिल केल्या आहेत. केवळ आधार कार्ड, पॅन कार्ड, जात वैधता प्रमाणपत्र या कागदपत्रांच्या आधारे घर घेता येणार आहे.
म्हाडाच्या बुक माय होम या संकेतस्थळावर नोंदणी करण्यासाठी अर्जदारांना मुदत दिली जाईल. त्यानंतर अनामत रक्कम भरून घर आरक्षित करता येईल. घर आरक्षित झाल्यानंतर 48 तासांच्या आत विक्री किमतीच्या 10 टक्के रक्कम भरल्यास संबंधित अर्जदाराला घर घेता येणार आहे. 10 टक्के रक्कम न भरल्यास इतर अर्जदारांना संधी मिळेल. उर्वरित 90 टक्के रक्कम भरण्यासाठी 90 दिवसांचा कालावधी दिला जाईल. पुढील काही दिवसांत या योजनेची जाहिरात येणार आहे.
या योजनेतील घरांच्या किंमती 40 लाख ते 7 कोटी दरम्यान आहेत. तुंगा पवई येथील इमारत क्रमांक 1 ए आणि 1 सी येथील घरांची अंदाजित किंमत 2 कोटी 25 लाख रुपये आहे. याच परिसरात इमारत क्रमांक 2 ए ते 2 एफ येथील घरांची अंदाजित किंमत 1 कोटी 50 लाख रुपये आहे.