मुंबई: महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) मुंबई मंडळाच्या सोडतीतील घरांच्या किंमती दरवर्षी नवे विक्रम करत आहेत. यंदाच्या सोडतीत शहर आणि उपनगरांतील घरांच्या किंमतींतील तफावत फारच कमी असल्याचे दिसत आहे. दादर आणि गोरेगाव येथील घरांचे क्षेत्रफळ जवळपास सारखे असूनही किंमतींमध्ये केवळ 30 लाखांचा फरक आहे.
गोरेगावच्या पत्राचाळीतील 85 घरे अल्प उत्पन्न गटासाठी उपलब्ध आहेत. या घरांचे क्षेत्रफळ 55.93 चौरस मीटर असून किंमत 1 कोटी 36 हजार 471 रुपये आहे.
दादर येथील लोकमान्य नगरमधील स्वगृह सोसायटीतील 3 घरांचे क्षेत्रफळ 55.23 चौरस मीटर असून त्यांची किंमत प्रत्येकी 1 कोटी 30 लाख 33 हजार 950 रुपये आहे. ही घरेही अल्प उत्पन्न गटाची आहेत. मात्र यामुळे शहर आणि उपनगरातील दरी कमी झाली असून सर्वसामान्य ग्राहकांना शहराप्रमाणेच उपनगरात घर घेणेही कठीण झाले आहे.
गोरेगावच्या शास्त्रीनगर येथील 58.8 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या घराची किंमत 1 कोटी 11 लाख 54 हजार 270 रुपये आहे. चेंबूरच्या सुभाषनगर येथील 53.62 चौरस मीटर क्षेत्रफळाच्या घराची किंमत 1 कोटी 12 लाख 46 हजार 178 आहे. वरळीच्या प्रेरणा सोसायटीतील अल्प उत्पन्न गटाच्या घरांची किंमत 2 कोटींहून अधिक आहे.
ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमधील घरे म्हाडाच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वाधिक महाग घरे आहेत. या इमारतीतील 8 कोटींचे एक घरे नुकतेच प्रथम प्राधान्य योजनेतून विकले गेले. मात्र इतर घरांच्या प्रश्न अजून सुटलेला नाही. या इमारतीतील दोन घरे उच्च उत्पन्न गटासाठी सोडतीत आहेत. त्यांची किंमत साडे सहा कोटींहून अधिक आहे.