MHADA Mumbai Lottery Pudhari
मुंबई

MHADA Housing: श्रीमंतांनाही परवडेनात म्हाडाची घरे; ३०४ घरे रिक्त

उच्च उत्पन्न गटाने २२५, तर मध्यम उत्पन्न गटाने ३३ घरे नाकारली

पुढारी वृत्तसेवा

नमिता धुरी

मुंबई: म्हाडाच्या मुंबई मंडळाने एप्रिलमध्ये २ हजार ६४० घरांची सोडत जाहीर केली होती. महागड्या किंमतींमुळे सोडतीतील ३०४ घरांसाठी एकही अर्ज आला नाही. यापैकी २२५ घरे उच्च उत्पन्न गटाची आहेत. म्हणजेच, म्हाडाची सोडत श्रीमंतांनाही परवडेनाशी झाली आहे.

ही घरे प्रचंड महाग असून वार्षिक १२ लाखांहून अधिक उत्पन्न असणाऱ्या उच्च उत्पन्न गटालाही ती परवडलेली नाहीत.

सोडतीत रिक्त राहिलेल्या ३०४ घरांमध्ये सर्वाधिक प्रमाण उच्च उत्पन्न गटातील घरांचे आहे. या गटासाठी उपलब्ध असलेल्या ८३९ घरांपैकी २२५ घरे रिक्त राहिली आहेत. वार्षिक ९ ते १२ लाख उत्पन्न असणाऱ्या मध्यम उत्पन्न गटासाठी सोडतीत ७९८ घरे समाविष्ट करण्यात आली होती. यातील ३३ घरांसाठी अर्जच आले नाहीत.

कन्नमवारनगर विक्रोळी येथे संकेत क्रमांक ५३८ आणि ५३९ असे दोन प्रकल्प म्हाडाने मध्यम उत्पन्न गटासाठी उभारले आहेत. येथे एकूण १ हजार २२१ घरे असून त्यांच्या किंमती दीड कोटींच्या जवळपास होत्या.

मुद्रांक शुल्क वगैरे इतर सर्व खर्च मिळून या घरांसाठी जवळपास २ कोटींचा ताण ग्राहकांना घ्यावा लागला असता. सोडतीची अर्ज प्रक्रिया सुरू असतानाच या घरांना अर्ज येत नसल्याचे लक्षात आल्याने घरांच्या किंमतींमध्ये ७.५ टक्क्यांची घट करण्यात आली होती.

किंमत कपातीची मात्रा काही केल्या लागू पडेना तेव्हा म्हाडाने या प्रकल्पांतील निम्मी घरे उच्च उत्पन्न गटाला देऊ केली; मात्र या श्रीमंत ग्राहकवर्गानेही ही घरे नाकारली आहेत. संकेत क्रमांक ५३८मधील २४० घरांपैकी ६१ घरे आणि संकेत क्रमांक ५३९मधील ३७० घरांपैकी १५१ घरे श्रीमंतांनी नाकारली आहेत.

मध्यम उत्पन्न गटाच्या दोन्ही प्रकल्पांमध्ये मिळून २४ घरे रिक्त राहिली आहेत. अल्प उत्पन्न गटातील काही घरांच्या किमतीही कोट्यवधींच्या घरात असल्याने ३९ घरे प्रतिसादाविना शिल्लक राहिली आहेत. परवडणाऱ्या लहान आकाराच्या घरांना सर्वाधिक मागणी असून अत्यल्प उत्पन्न गटातील केवळ ७ घरे शिल्लक राहिली आहेत. परिणामी, आता केवळ २ हजार ३३६ घरांसाठीच सोडत काढली जाणार आहे.

परवडणाऱ्या घरांना मागणी

सर्वात लहान एकमेव वन आरके घर असलेल्या चांदिवली पवई येथील घरासाठी ३८६ अर्ज दाखल झाले आहेत. या घराची किंमत २६ ते २७ लाखांदरम्यान आहे. गोरेगावच्या पीएमएवाय प्रकल्पात केवळ १३ घरे असताना येथे तब्बल १७ हजार ७४० अर्ज आले आहेत. म्हणजेच एका घरामागे १ हजार ३६५ अर्ज. संकेत क्रमांक ४१४ ब येथे २३ घरांसाठी ५ हजार २५४ अर्ज आले आहेत. ४१५ ब या संकेत क्रमांकात ४ घरांसाठी ४५७ अर्ज आले आहेत.

विक्रोळी येथे संकेत क्रमांक ५३४मध्ये अत्यल्प गटाच्या ८६ घरांसाठी २ हजार ५९४ अर्जदार इच्छुक आहेत. मानखुर्द येथे संकेत क्रमांक ३६४ ड येथे ३० लाखांपेक्षा कमी किंमतीची ४ घरे असून त्यासाठी ४९ अर्जदार आहेत. अँटॉप हिल येथे ४७३ अ मध्ये ८३९ आणि ४१३ क मध्ये १८३ अर्ज आले आहेत. येथे अनुक्रमे ९ आणि ५ घरे आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT