मुंबई : म्हाडाने सोडतील समाविष्ट केलेल्या घरांपैकी सर्वात महागडे घर जवळपास ६९ लाखांना आहे. ठाण्याच्या बाळकुम येथील या घराची किंमत ६८ लाख ९७ हजार १६० रुपये आहे.
बाळकुम येथील घर मध्यम उत्पन्न गटासाठी असून त्याचे क्षेत्रफळ ६७.०६ चौरस मीटर आहे. यासाठी १५ हजार रुपये अनामत रक्कम आकारली जाणार आहे. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीत घर न लागल्याने नाराज झालेल्या अर्जदारांना कोकण मंडळाकडून आशा होती; मात्र कोकण मंडळाने केवळ १ हजार ३२२ सदनिकांची नव्याने सोडत काढली आहे. बाकी सर्व ११ हजार सदनिका विक्रीअभावी पडून असलेल्या गृहप्रकल्पांमधील आहेत. जुन्या सोडतीतील सदनिका या मुख्य रेल्वे स्थानकापासून दूरच्या अंतरावर आहेत. या ११ हजार १८७ सदनिकांची विक्री प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर केली जाणार आहे. मात्र रेल्वे स्थानकापासून दूर असलेली ठिकाणे पाहता ही घरे यावर्षी तरी विकली जातील का, याबाबत शंका आहे. सोडतीतील सर्वात स्वस्त घर अत्यल्प उत्पन्न गटासाठी आहे. कल्याणच्या तीसगाव येथे गौरी विनायक सोसायटीत २३.४२ चौरस मीटरचे आहे. याची किंमत ९ लाख १४ हजार ८०० रुपये आहे. यासाठी केवळ ५ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे.
म्हाडाच्या 'मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळा'च्या बृहतसूचीवरील • मूळ भाडेकरू किंवा रहिवासी यांना देण्यात येणाऱ्या सदनिकांसाठी म्हाडाने पात्र धोरणात्मक निर्णय जाहीर केला आहे. या रहिवाशांना जुन्या निवासी गाळ्याच्या मूळ किंवा अनुज्ञेय क्षेत्रफळाव्यतिरिक्त जास्त क्षेत्रफळाच्या सदनिका दिल्यास अतिरिक्त क्षेत्रफळासाठी शीघ्रसिद्ध गणकदाराच्या (रेडीरेकनर) १२५ टक्के रकम आकारली जाते. नव्या धोरणानुसार केवळ ११० टक्के रक्कम आकारली जाणार आहे. बृहतसूचीवरील भाडेकरू, रहिवाशांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावर तोडगा काढण्याच्या दृष्टीने आयोजित बैठकीमध्ये म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी सांगितले की, बृहतसूचीवरील बहुसंख्य भाडेकरू आणि रहिवासी यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. तसेच त्यांना देय असलेल्या ३०० चौरस फूट क्षेत्रफळाच्या सदनिका पुरेशा प्रमाणात विकासकांकडून मंडळास उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनुज्ञेय असलेल्या ३०० चौरस फूटांच्या सदनिका पात्र लाभार्थ्यांना मिळू शकत नाहीत. परिणामी त्यांना जास्त क्षेत्रफळाच्या सदनिका वितरित करण्यात येतात.