मुंबई : सामान्य नागरिक मुंबईत आणि मुंबईच्या जवळपासच्या भागांत घर घेण्यासाठी आशा लावून बसलेले असताना केवळ राखीव कोट्याच्या नावाखाली काही घरे आमदार, खासदारांना स्वस्त दरांत विकली जात आहेत. तीसगाव, कल्याण येथील म्हाडाच्या कोकण मंडळाचे घर आमदार, खासदारांना केवळ साडे नऊ लाखांत मिळणार आहे.
एका बाजूला निवडणुकीच्या वेळी लोकप्रतिनिधींकडे असलेल्या गडगंज संपत्तीचा तपशील समोर येत असताना त्यांना म्हाडा एवढ्या स्वस्तात घर देत असल्याचे पाहून सामान्य नागरिकांच्या भुवया उंचावल्या आहेत. म्हाडाची अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील 65 घरे आमदार, खासदार कोट्यासाठी राखीव आहेत. या घरांच्या किंमती साडे नऊ लाख ते 31 लाखांच्या दरम्यान आहेत.
आमदार, खासदारांचे उत्पन्न अधिक असल्याने त्यांच्यासाठी राखीव असलेल्या अत्यल्प व अल्प उत्पन्न गटातील घरांसाठी अर्ज येत नसल्याचे कारण देत हा कोटा रद्द करण्याचा प्रस्ताव म्हाडाने राज्य शासनाला पाठवला होता. मात्र अद्याप या प्रस्तावावर काहीच निर्णय झालेला नाही.