मुंबई : म्हाडाच्या फ्लॅटच्या नावाने व्यावसायिकाची 37 लाखांची फसवणुक केल्याप्रकरणी एका पती-पत्नीविरुद्ध काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रुपेश रमेश सावंत आणि स्नेहा रुपेश सावंत अशी या दोघांची नावे आहेत. या दोघांची पोलिसांकडून चौकशी होणार आहे. म्हाडा फ्लॅट देतो असे सांगून त्यांनी अशाच प्रकारे इतर काही लोकांची फसवणुक केली आहे का याचा तपास सुरु आहे.
47 वर्षांचे तक्रारदार लालबाग येथे राहत असून त्यांची स्वतची एक खाजगी कंपनी आहे. नऊ वर्षांपूर्वी त्यांना एक फ्लॅट विकत घ्यायचा होता. यावेळी त्यांच्या एका परिचिताने त्यांची ओळख रुपेश सावंतशी करुन दिली होती. रुपेश हा म्हाडाची गिरणी कामगारांची रुम स्वस्तात मिळवून देत असल्याचे सांगितले होते. त्याने आतापर्यंत अनेकांना म्हाडाचे रुम विक्री केली असून तोच त्यांना मदत करेल असे सांगितले. त्यामुळे त्यांनी रुपेशची भेट घेतली होती. म्हाडाचा रुम देतो असे सांगून रुपेश आणि त्याची पत्नी स्नेहा यांनी त्यांची फसवणुक केल होती.
यावेळी रुपेशने तो म्हाडाचा एजंट असल्याचे सांगून त्यांना एका गिरणी कामगाराचा फ्लॅट 39 लाखांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर त्यांच्यात एक करार झाला होता. या करारानंतर त्यांनी त्याला टप्याटप्याने 37 लाख रुपये दिले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्याने त्यांना म्हाडाचा फ्लॅट दिला होता. ज्या गिरणी कामगाराचा फ्लॅट रुपेश देणार होता, त्या कामगाराकडे चौकशी केल्यानंतर त्याला रुपेशने रुमसाठी एकही रुपया दिला नसल्याचे समजले. त्यामुळे त्यांनी रुपेशकडे पैशांची मागणी सुरु केली होती.
62 गुंठे जमिन विक्री
रुपेश, त्याची पत्नी स्नेहा आणि मित्र अनिल मुळीक यांनी त्यांच्या नावे असलेली सातार्यातील पाटण तालुक्यातील 62 गुंठे जमिन विक्री करुन त्यांना पैसे देण्याचे आश्वासन दिले. मात्र वारंवार विचारणा करुनही त्याने त्यांना 37 लाख रुपये परत केले नाही. त्यामुळे ते त्यांच्या गावी गेले होते. यावेळी रुपेशचे वडिल आणि चुलत्यांनी त्यांनाच हातपाय तोडून देण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तक्रारदार त्यांच्या वकिलासह मुंबईत परत आले होते.