मुंबई : वडाळा ते गेट वे ऑफ इंडिया मेट्रो ११ या दुसऱ्या भुयारी मेट्रो मार्गिकच्या प्रकल्पाला बुधवारी (दि.3) मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पासाठी २३ हजार ४८७कोटी ५१ लाख रुपये खर्च मंजूर करण्यात आला आहे. ठाणे वर्तुळाकार मेट्रोलाही मंत्रिमंडळाने या बैठकीत मान्यता दिली.
भुयारी मेट्रो सुरू करण्याचा अनुभव असलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला हे काम देण्यात आले आहे. १७.५१ किमी लांबीच्या या पूर्णपणे भूमिगत मेट्रो प्रकल्प मार्गात १४ स्थानके आहेत. या मार्गिकेमुळे आणिक आगर, वडाळा ट्रक टर्मिनल, सीजीएस कॉलनी, गणेश नगर, बीपीटी रुग्णालय, शिवडी, वाडी बंदर, दारुखाना, भायखळा, नागपाडा, भेंडी बाजार, महात्मा ज्योतिबा फुले मंडई (क्रॉफर्ड मार्केट), हॉर्निमन सर्कल आणि गेटवे ऑफ इंडिया ही ठिकाणे जोडली जाणार आहेत. यामुळे दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी कमी होईल.
या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडे ३ हजार १३७ कोटी ७२ लाख रुपयांचे समभाग आणि ९१६ कोटी ७४ लाख रुपयांचे बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य मिळविण्याकरिता विनंती करण्यात येणार आहे. प्रकल्पासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाच्या परतफेडीची जबाबदारी स्वीकारण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली.
ठाणे वर्तुळाकार मेट्रो प्रकल्प, पिंपरी-चिंचवड ते निगडी मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, स्वारगेट ते कात्रज मेट्रो रेल्वे कॉरीडॉर, वनाज ते चांदणी चौक व रामवाडी ते वाघोली मेट्रो कॉरीडॉर (विठ्ठलवाडी), पुणे मेट्रो मार्ग-४ (खडकवासला - स्वारगेट हडपसर-खराडी) आणि नळ स्टॉप वारजे-माणिकबाग (उप मार्गिका) व नागपूर मेट्रो रेल्वे टप्पा-२ या मेट्रो रेल्वे प्रकल्पांना यापुर्वीच मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठी घेण्यात येणाऱ्या कर्जाची जबाबदारी स्वीकारण्यास तसेच त्यासाठी आवश्यक करार करण्यास बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांना मंजूर केलेल्या मयदित द्वीपक्षीय, बहुपक्षीय वित्तीय संस्था किंवा अन्य संस्थांमार्फत सुलभ व्याज दराचे कर्ज उपलब्ध करून घेता येणार आहे. त्यांना या कर्जाची मुद्दल, व्याज व इतर शुल्क यांची परतफेड करावी लागणार आहे. या कर्जाच्या अनुषंगाने आवश्यकता वाटल्यास शासन हमी देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
दरम्यान, ठाणे ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत उड्डाण पूल उभारण्यास राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी मान्यता दिली. हा उड्डाणपूल सिडको महामंडळामार्फत उभारण्यात येणार असून त्यासाठीच्या ६ हजार ३६३ कोटी रुपयांच्या खर्चाच्या अंमलबजावणीला देखील मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.
हा प्रकल्प पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर सिडको महामंडळामार्फत बांधण्यात येणार आहे. सदर प्रकल्पास महत्त्वकांक्षी नागरी प्रकल्प म्हणूनही घोषित करण्यास मान्यता देण्यात आली. या मार्गालगतची अतिरिक्त जमीन व्यावसायिक वापरासाठी संपादित करण्यास तसेच मार्गिकेखालील शासकीय मालकीची जमीन नाममात्र दराने सिडको महामंडळास देण्यास देखील मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळे ठाणे शहर नवी मुंबई विमानतळाला थेट उन्नत मार्गाने जोडले जाणार आहे.