मुंबई : नवीन वर्षात महामुंबईला ४ नव्या मेट्रो मार्गिका मिळणार आहेत. दहिसर ते काशिगाव मेट्रो ९, मंडाळे ते डायमंड गार्डन मेट्रो रब, कॅडबरी जंक्शन ते गायमुख मेट्रो ४ आणि ठाणे ते भिवंडी मेट्रो ५ मार्गिका यांचे काम सध्या अंतिम टप्प्यात आहे.
दहिसर ते काशिगाव मेट्रो ९ मार्गिकची सीएमआरएस चाचणी पूर्ण झाली आहे. मेट्रो २ ब मार्गिकच्या मंडाळे ते डायमंड गार्डन या पहिल्या टप्प्यालाही सीएमआरएस प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. मात्र आचारसंहितेमुळे या दोन्ही मेट्रो मार्गिकांचे लोकार्पण रखडले. मेट्रो ९ मार्गिकचा दहिसर ते काशिगाव हा टप्पा सुरू झाल्यास मेट्रो ७ आणि मेट्रो ९ या मार्गिकांचे एकत्रीकरण होईल. यामुळे गुंदवली ते काशिगाव असा थेट प्रवास करणे शक्य होईल.
मेट्रो २ मार्गिकचा विस्तार असलेल्या मेट्रो २ ब मार्गिकेमुळे अंधेरी पश्चिम ते मंडाळेपर्यंत प्रवास करता येईल. मात्र सध्या मेट्रो २ब मार्गिकच्या मंडाळे ते डायमंड गार्डन या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. सीएमआरएस प्रमाणपत्रही मिळाले आहे. आचारसंहितेमुळे रखडलेले लोकार्पण नवीन वर्षात पार पडेल. यामुळे पूर्व उपनगरवासीयांना मेट्रो प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
मेट्रो ४ मार्गिकेचा कॅडबरी जंक्शन ते कासारवडवली हा पहिला टप्पा आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो ४ अ मार्गिका अशा एकूण १०.५ किमी मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आहे. यात कॅडबरी, माजिवडा, कापूरबावडी, मानपाडा, टिकूजिनीवाडी, डोंगरीपाडा, विजय गार्डन, कासारवडवली, गवणीवाडा आणि गायमुख ही स्थानके आहेत. तसेच ठाणे-भिवंडी-कल्याण या मार्गावर मेट्रो ५ मार्गिका धावणार आहे. २४.९० किमीच्या या मार्गिकेची बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे नव्या वर्षात मुंबईसह महामुंबईकरांना एकूण ४ नवीन मेट्रो मार्गिका मिळणार आहेत.
मिसिंग लिंक सुरू होणार
मुंबई ते पुणे प्रवासातील अंतर आणि वेळ कमी करणाऱ्या मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाचे ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे. केवळ ६५० मीटरच्या केबल स्टेड पुलाचे काम शिल्लक आहे. खोल दरीवर हा पूल उभारला जात आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल व एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मुंबई-पुणे मिसिंग लिंकवरून वाहतूक सुरू केली जाईल. सध्या ज्या परिसरात मिसिंग लिंक उभारला जात आहे तो भाग द्रुतगती मार्गावरून पार करताना लोणावळा आणि खंडाळा घाट ओलांडावा लागतो. नागमोडी वळणांमुळे हे अंतर १९ किमी आहे. मिसिंग लिंकमुळे हा प्रवास ६ किमीने कमी होईल.